कोगनोळी : येथील आरटीओ चेक पोस्ट समोर झालेल्या ट्रक व मोटरसायकल अपघातात श्रेया हेमंत हळीज्वाळे (वय 14 रा. कसबा सांगाव ता. कागल) ही शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. परीक्षा संपल्याने श्रेया मामासोबत गावी निघाली असता काळाने तिच्यावर घाला घातला. ही घटना आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी, की नुकत्याच शाळेच्या परीक्षा संपल्याने श्रेया आपल्या मामाबरोबर सुट्टीसाठी दुचाकीवरुन बेळगावकडे निघाली होती. कोगनोळी येथील आरटीओ चेक पोस्ट समोरून जात असताना सेवा रस्त्यावरून महामार्गावर येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक झाली. यात श्रेया व तिचा मामा शशिधर दोघेही दुचाकीवरून खाली पडले.यावेळी ट्रकचे मागील चाक श्रेयाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर शशिधर यांना किरकोळ दुखापत झाली. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निपाणी येथील महात्मा गांधी इस्पितळामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.एकुलती एक श्रेयाश्रेयाचे आजोबा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले तर वडील विक्रीकर विभागात कार्यरत आहेत. अशा या सुशिक्षित परिवारातील श्रेया ही एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.
Kolhapur: सुट्टीला मामाच्या गावी जाताना भाचीवर काळाचा घाला, कोगनोळीजवळ अपघातात जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 7:21 PM