प्रकाश पाटील- कोपार्डे --हंगाम २०१४-१५ची सुरुवात नोव्हेंबर २०१४ मध्ये झाली. यावेळी साखरेचे दर ३ हजार १०० रुपये होते. राज्य बँकेने बाजारातील या साखर दराचा विचार करून २६८० रुपये प्रतिक्विंटल उत्पादित होणाऱ्या साखरेसाठी मूल्यांकन करून त्याच्या ८५ टक्के रक्कम उचल देण्यास सुरुवात केली. मात्र, यानंतर गेल्या पाच महिन्यांत साखरेच्या दरात सतत घसरण सुरू राहिल्याने राज्य बँकेकडून देण्यात येणाऱ्या उचलित वारंवार घट करण्यात आली आहे.या गळीत हंगामात सलग चारवेळा राज्य बँकेने साखर मूल्यांकनात घट केली आहे. यामुळे साखर कारखानदार पुन्हा आर्थिक अरिष्टात सापडला आहे.सध्या साखरेचे दर २२०० ते २३०० रुपयांवर घसरल्याने राज्य बँकेने साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल देण्यात येणाऱ्या उचलीवर पुन्हा घट करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य बँक प्रत्येक तिमाहीमध्ये बाजारातील साखरेच्या दरावर प्रतिक्विंटल कर्ज म्हणून उचल जाहीर करते. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत साखरेचे दर ३ हजार ते ३१०० प्रतिक्विंटल होते. यानंतर साखरेच्या दरात वारंवार घसरण सुरू झाल्यानंतर राज्य बँकेने सावध पवित्रा घेऊन प्रत्येक तिमाहीला ठरविण्यात येणाऱ्या मूल्यांकनाचा पायंडा बदलत आपली भूमिका बदलली. कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उतारा १२ असल्याने त्याचा ३०० रुपये व मोलॅसिस व बगॅस यातून १०० रुपये असे ४०० रुपये जादा मिळणार असले तरी जिल्ह्याची उसाची सरासरी एफ.आर.पी. २५०० रुपये असल्याने १ हजार रुपये कोठून उभे करायचे, हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारीमध्ये साखरेच्या दरामध्ये २६०० पर्यंत घसरण झाल्यानंतर २५३० रुपये फेब्रुवारीमध्ये पुन्हा बाजारातील साखरेचे दर २५०० ते २५५० वर आल्यानंतर २४३० चे मूल्यांकन केले. मात्र मार्च उजाडताच साखर दर २३०० ते २४०० वर प्रतिक्विंटलवर दर आल्याने यामध्ये राज्य बँकेने पुन्हा प्रतिक्विंटल मूल्यांकनात घट करून २३३० प्रतिक्विंटल केली. मात्र सध्या बाजारातील साखरेचे दर पुन्हा घसरून २२०० ते २३०० रुपयांवर आल्याने आता यामध्येही घट करून आता २१९० रुपये प्रतिक्विंटल साखर मूल्यांकन केले आहे.या मूल्यांकनाचे ८५ टक्के म्हणजे १८६० रुपये कारखानदारांना मिळत असले तरी यातील पुन्हा राज्य बँक ५०० रुपये कारखान्यांच्या पूर्वीच्या कर्जाचा हप्ता, व्याज व २५० रुपये उत्पादन खर्च वजा करून घेत असल्याने केवळ १११० रुपयेच ऊसदर देण्यासाठी कारखानदारांच्या हातात उरणार आहेत.
साखर मूल्यांकनात चौथ्यांदा घट
By admin | Published: March 25, 2015 9:16 PM