नाना जाधव
भादोले : भादोले ता. हातकणंगले येथील कुशाजी मळा परिसरातील नानासो माने यांच्या ४० ते ५० फूट खोल विहिरीत गुरुवारी रात्री पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीव पथकाने जीवदान दिले.माने यांच्या शेतातील बांधीव विहिरीत रात्रीच्या सुमारास कोल्हा पडला होता. विहिरीत एका कोपऱ्यात तो बाहेर येण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपडत होता. रात्रभर हा कोल्हा ओरडत होता. या आवाजामुळे विहिरीत डोकावून पाहिले असता कोल्हा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मदतीने कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. त्यांनी निसर्गप्रेमी डॉ. अमोल पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ परिमंडळ वन अधिकारी साताप्पा जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी वन्यजीव बचाव पथक पाठवले. अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाने कोल्ह्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. कोल्ह्यास कोणतीही इजा नसल्याचे पाहून त्याच ठिकाणी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वन्यप्राण्याचा भक्ष्याच्या व पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीत वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वन्य जीव पथकाचे अमोल चव्हाण यांनी केले. बचाव कार्यात वन्यजीवबचाव पथकातील अमोल चव्हाण, मतीन बागी, ओंकार काटकर, आशुतोष सूर्यवंशी यांचा सहभाग होता.