कोपार्डे : बालिंगा (ता.करवीर) येथील सराफ व्यावसायिक सतीश पोळकर याच्या विरोधात आज 50 ते 60 फसवणूक झालेल्या लोकांनी तक्रार देण्यासाठी करवीर पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत तक्रारी नोंद करून घेण्याचे काम सुरू होते.
दोनवडे येथील सतीश पोळकर बालिंगा येथे सराफ व्यवसाय करीत होता. आंबिका ज्वेलर्स नावाने त्याचे येथे कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर ज्वेलरीचे दुकान आहे. तो सोनेतारण कर्ज देत होता. याशिवाय त्यांच्याकडे अनेक लोकांनी पिग्मी व सुवर्ण ठेवीच्या रूपात पैसे गुंतवले होते.
गेली आठ दिवस तो आपल्या कुटुंबासह गायब असल्याची कुणकुण लागताच गुरुवारी गुंतवणूकदारांनी त्याच्या दुकानसमोर ठिय्या दिला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्याचे समजताच गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. फसवणूक झालेल्या मुकुंद बोडके, विनायक चंद्रकांत गुरव, भाग्यश्री आयरेकर, नितीन माळी, अमित कानकेकर (बालिंगा) राजेंद्र चिवटे, सर्जेराव पाटील (दोनवडे), अमर डेंगे, दत्ता ढेरे, प्रियांका ढेंगे (नागदेवाडी) यांच्यासह फसवणूक झालेले लोक शुक्रवारी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.
पण सकाळपासून या तक्रारदारांची तक्रार दाखल करून न घेतल्याने पोलीस ठाण्यात त्यांना ताटकळत बसावे लागले होते. अखेर वरिष्ठांंशी चर्चा करून तक्रारदारांची सायंकाळी 5 नंतर तक्रार नोंदवण्याचेे काम सुरू झाले. तक्रारदारांची संख्या मोठी असल्याने करवीर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता
आज अनेक गुंतवणूकदारांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. एकेका गुंतवणूकदाराचा आकडा लाखोच्या घरात असल्याने रक्कम कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे. जसजसे बेपत्ता सराफाची माहिती मिळेल तसे अनेक तक्रारदार पुढे येणार असल्याने फसवणुकीची व्याप्ती वाढणार आहे.
प्रतिक्रिया
तक्रारदारांच्या नोंदी सुरू असून, संख्या मोठी असल्याने उशिरापर्यंत काम सुरू राहील.
फिरोज मुल्ला ( करवीर पोलीस ठाणे )
सकाळीपासून पोलीस ठाण्यात 50 ते 60 जण तक्रार देण्यासाठी जमा झालो होतो. तक्रारीची नोंद घेतली असली तरी फसवणूक करणारा सतीश पोवाळकर व त्याला मदत करणारा मेव्हणा अमोल पोवारची चौकशी करावी -
विनायक गुरव बालिंगा तक्रारदार