कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्याविरोधात सहकार न्यायालयातील दाखल केलेले दावे मागे घेतल्यावरून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात धुसफुस सुरू आहे. बॅँक अडचणीत आहे, संस्थांना आठ वर्षे लाभांश मिळत नसताना कारखान्यावर एवढी मेहरनजर कशाबद्दल? असा सवाल एका ज्येष्ठ संचालकाने उपस्थित केला आहे. बँकेचे ८४ कोटी रुपये वसूल झाले असले तरी अवसायन काळातील व्याजाबाबत प्रलंबित असलेले दावे मागे घेऊ नयेत, असा आग्रह होता; पण कार्यकारी समितीने परस्पर निर्णय घेत दावे मागे घेऊन मग संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवल्याचा आरोप होत आहे. ‘दत्त’कारखान्याच्या थकीत कर्जापोटी २००६ ला कारखाना अवसायनात काढला. जिल्हा बँकेने थकीत ८४ कोटी रुपयांच्या कर्जासाठी कारखान्याविरोधात सहकार न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये अवसायन काळातील व्याज मिळावे, अशी याचिका होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी २०१२ मध्ये कारखान्याचा ताबा घेत १०८ कोटीला ‘दालमिया’ला विक्री करून बॅँकेचे ८४ कोटी वसूल केले. त्यामुळे संचालक मंडळ कार्यरत झाल्यापासून दावे मागे घेण्यासाठी रेटा सुरू होता. दावे मागे घेतल्याने एका ज्येष्ठ संचालकाने नाराजी व्यक्त करत अवसायन काळातील ६० कोटी व्याज होते. सभासदांना एक दमडीही लाभांश दिलेला नसताना कारखान्याच्या संचालक मंडळावर एवढी मेहरनजर कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचे समजते. यावरून संचालक मंडळात धुसफुस सुरू आहे.‘दत्त’च्या कर्जाबाबत प्रशासक काळात ‘एनओसी’ दिलेली आहे. त्यांच्या अवसायक काळातील व्याजाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन दावे मागे घेतले आहेत. काही संचालकांचे वेगळे मत आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ.- आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष, जिल्हा बॅँक
‘दत्त-आसुर्ले’वरून संचालक मंडळात धुसफुस
By admin | Published: August 09, 2016 12:05 AM