कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने एका दाम्पत्यासह सुमारे २० लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. काही रकमेच्या परताव्यापोटी जमिनीचे बनावट खरेदीपत्र करून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नीलेश रामकुमार पाटील, पूर्वा नीलेश पाटील (दोघेही रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) या संशयितांवर गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी नीलेश पाटील हे श्री अनघा लक्ष्मी ब्रोकिंग प्रा. लि. कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये मंगळवार पेठेतील ललिता मांगलेकर व त्यांचे पती राजेंद्र मांगलेकर यांची भेट घेतली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दीड टक्के परतावा देऊ, असे सांगून मांगलेकर दाम्पत्याकडून २१ लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले. ठरलेल्या कराराप्रमाणे एप्रिल २०११ मध्ये मांगलेकर यांना परतावा दिला. त्यानंतर परतावा देणे बंद केल्याने त्यांनी पाटील यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला.
संशयितांनी मांगलेकर यांना मे २०१९ मध्ये २.५ टक्के परतावा देण्याचे करारपत्र करून दिले. पैशाचा तगादा लावल्याने संशयिताने मांगलेकर यांना ५ लाखांची मूळ मुद्दल परत दिली. उर्वरित रकमेसाठी संशयित पाटील याने दुसऱ्याला विकलेला प्लॉट सव्वासहा लाखाला त्यांच्या नावे करून देण्याचे खोटे करारपत्रही करून दिले; पण प्लॉटबाबत खरी माहिती उघड झाल्यानंतर मांगलेकर दाम्पत्याने संशयिताला जाब विचारला. संशयिताने त्यांना ६ लाख ४० हजार रुपयांचा मोबदला दिला. त्यानंतर पैसे देणे बंद केले.
त्यामुळे मांगलेकर यांनी, मूळ मुद्दल १६ हजार रुपये व त्यावरील कराराप्रमाणे ठरलेला मोबदला असे एकूण २० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्याबाबत नीलेश पाटील व त्यांची पत्नी पूर्वा पाटील या दाम्पत्यावर गुन्हा नोंद झाला आहे.