सुनिल चौगले -आमजाई व्हरवडे -आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेचे काम सुरू असून, योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदारांचे पूर्ण बील अदा करावे, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला होता. मात्र, काम अपूर्ण असतानासुद्धा ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने ग्रामपंचायतीच्या चालू खात्यावरून ४३ लाख रुपयांची परस्पर उचल झाली आहे. ग्रामसभेत ठराव करूनसुद्धा पेयजल कमिटीतील सदस्यांच्या परस्पर रक्कम उचलण्याने या पेयजल योजनेतील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पेयजल कमिटीतील चौदा सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राधानगरी यांच्या अंतर्गत सध्या गावामध्ये पेयजल योजनेचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. १५ आॅगस्ट २०१२ रोजी झालेल्या गावसभेत सदर योजनेच्या ठेकेदारांना १३ लाख रुपये अदा करावेत, असा ठराव झाला होता. तसेच योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय कोणतेही बिल अदा करू नये, असा ठराव झाला होता. यानंतर आजअखेर गावसभेमध्ये तसेच सदस्य मिटिंगमध्ये कधीही ठेकेदारांना बिल अदा करण्याबाबतची कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा लेखी ठराव झाला नाही. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या बॅँक खात्यावरून ४३ लाखांची उचल ग्रामसेवक व काही पदाधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे दिसून येते. या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट असून, प्लॅन व इस्टिमेटमधील अनेक कामे अपूर्ण, तर काही कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. अशा अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या योजनेची बिले कोणाच्या सहमतीने व कोणास अदा करण्यात आली याची चौकशी व्हावी. तसेच या योजनेच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी व संबंधित व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. जर या कामाची चौकशी झाली नाही, तर न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.माजी सरपंच अशोक सुतार, उपसरपंच केरबा वडरे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख बंडोपंत पाटील, राजेंद्र चौगले, कृष्णात चौगले, रोहिणी पाटील, स्नेहल पाटील, आनंदी पाटील, मारुती पाटील, मारुती रणदिवे, हेमा कांबळे, शांताबाई पोवार, नंदा पाटील या पेयजल योजनेतील कमिटीच्या चौदा सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.सुभेदारसाहेब स्वत: लक्ष घालाजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सूत्रे स्वीकारल्याबरोबर त्यांनी प्रशासनाला एक शिस्त लावल्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रशासनावर वचक असल्याने काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आाहेत. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सुभेदार यांचा जिल्ह्यात लौकिक आहे.राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे ग्राम पंचायत सतत अनेक कारणांनी चर्चेत आहे. येथे जॅकवेल म्हणून सुरू केलेला पाणीपुरवठा तर मोठा गाजला. पाण्यामुळे भांडीच पिवळी पडत होती. ‘लोकमत’ने आवाज उठविल्यावर शासकीय यंत्रणा जागी झाली. आजही पाण्याच्या नमुन्याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या पेयजलच्या कामाच्या चौकशीचे आदेश तत्काळ देऊन अविनाश सुभेदार यांनीच लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.अनेक कामे अपूर्णया पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट असून, प्लॅन व इस्टिमेटमधील अनेक कामे अपूर्ण, तर काही कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.
पेयजल योजनेमध्ये अफरातफर
By admin | Published: November 18, 2014 12:03 AM