कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूदारांकडून घेतलेले कोट्यवधी रुपये देश-विदेशातील कॅसिनोत गुंतवल्याचा धक्कादायक खुलासा कंपनीचा संचालक अमर विश्वास चौगले (रा. गडहिंग्लज) याने एका व्हिडीओतून केला आहे. कॅसिनो म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे, त्यामुळे कंपनीने कॅसिनोत गुंतवलेले पैसे परत मिळतील की नाही, या चिंतेने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून कार्यालये बंद ठेवलेल्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. कंपनीचे कारनामे आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. गुंतवणूकदारांचा पैसा शेअर बाजारात गुंतवून त्यातून भरघोस परतावा मिळवत असल्याचे कंपनीच्या संचालकांकडून आणि एजंटकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र कंपनीचा बराच पैसा शेअर बाजारात नाही, तर चक्क कॅसिनोत गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचा संचालक अमर चौगले यानेच एका व्हिडीओतून ही माहिती जाहीर केली.भारतासह नेपाळ, श्रीलंका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमधील कॅशिनोशी ए. एस. ट्रेडर्स कंपनीने करार केले आहेत. गुंतवलेल्या पैशातून कंपनीला आणि गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळणार आहे. गुंतवणूकदार स्वत: कॅसिनोमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळू शकतात. त्यासाठी ए. एस. टोकनचा वापर करू शकता, अशी माहिती खुद्द कंपनीचा संचालक चौगले यानेच दिली आहे. कॅसिनोत गुंतवणूक करणे ही गुंतवणूकदारांची फसवणूक असल्याचा आरोप ए. एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने केला. कॅसिनो म्हणजे जुगारचकॅसिनोमधून पैसे कमवल्याचे एकही उदाहरण आपल्या आसपास दिसत नाही. कॅसिनो हा एक प्रकारचा जुगारच आहे. याच्या नादी लागून अनेकांना आपले घर-दार विकावे लागले. ए. एस. ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे कॅसिनोत लावून जुगार खेळल्याचा आरोप विरोधी कृती समितीने केला आहे.
गुंतवणूकदार अस्वस्थए. एस. ट्रेडर्सच्या तपासात पोलिसांकडून विशेष गती नाही. संचालक आणि एजंटचे मोबाईल बंद आहेत. ११ नोव्हेंबरला ऑनलाईन मीटिंग होणार असल्याचा एक मेसेज गुंतवणूकदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल होत आहे. मात्र, ही मीटिंग होईल की नाही त्याबद्दल खात्री नाही, तर कंपनीची कार्यालये अजून बंदच असल्याने गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली आहे.