कोल्हापूर : ऑक्ट नाईन फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला संशयित अभिजित जोती नागावकर (वय ३५, रा. अयोध्या पार्क, कोल्हापूर) याच्याकडील दोन आलिशान कार राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) जप्त केल्या. ताराराणी चौक परिसरातील अयोध्या पार्कच्या पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही कार संशयित नागावकर याने गुंतवणूकदारांच्या पैशांतून घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के बोनस देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजारामपुरीतील ऑक्ट नाईन कंपनीवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित अभिजित नागावकर याला पोलिसांनी अटक केली असून, कंपनीचे कार्यालय आणि संशयिताच्या घराची झडती घेतल्यानंतर मंगळवारी आलिशान वाहने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये जग्वार (एमएच-१२ एचएल ९१६९) आणि मर्सिडीज (एमएच-२० बीएन ६०४१) या आलिशान कारचा समावेश आहे. दोन्ही कारची मूळ किंमत सुमारे सव्वा कोटी रुपये आहे.पोलिसांनी वाहनांची कागदपत्रेही जप्त केली आहेत. दोन आलिशान कारच्या जप्तीनंतर नागावकरच्या काही महागड्या दुचाकीही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याने नातेवाइकांच्या नावावर काही वाहनांची खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे. फ्लॅट, प्लॉट आणि जमीन खरेदीतही त्याने कोट्यवधी रुपये गुंतवल्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.
दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: संशयित अभिजित नागावकरची आलिशान जग्वार, मर्सिडीज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 5:32 PM