कोल्हापूर : ट्रेडिंगसाठी भरलेल्या रकमेवर १० महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सेन्स ऑप्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांची दीड कोटीची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल २०२३ ते जुलै २०२४ या काळात घडला. याबाबत प्रदीप प्रकाश दुगानी (वय ३२, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) यांनी मंगळवारी (दि. ८) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कंपनीचा मालक, सीईओ, अकाउंटंट आणि दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.कंपनीचा मालक संदीप बाजीराव पाटील, सीईओ सागर बाबूराव खुटावळे, अकाउंटंट विकास राजाराम कांबळे (तिघे रा. आमशी, ता. करवीर), कर्मचारी धनाजी तुकाराम खोत (वय ४०, रा. सावरवाडी माळवाडी, ता. करवीर) आणि सुदाम सदाशिव चव्हाण (रा. सांगरुळ, ता. करवीर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील धनाजी खोत याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमशी येथील संदीप पाटील याने दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी येथील माणिक चेंबर्समध्ये सेन्स ऑप्शन ही ट्रेडिंग कंपनी सुरू केली. या कंपनीने गुंतवणूकदारांना ट्रेडिंगच्या रकमेवर दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. मूळ रक्कम सुरक्षित राहून अवघ्या दहा महिन्यांत १०० टक्के परतावा मिळण्याच्या अपेक्षेने अनेकांनी कंपनीत पैसे गुंतवले. फिर्यादी प्रदीप दुगानी यांच्यासह इतरांनीही एप्रिल-२०२३ मध्ये कंपनीत मोठ्या रकमा गुंतविल्या.दहा महिने पूर्ण झाल्यानंतर ते परतावा घेण्यासाठी कंपनीत गेले. मात्र, कंपनीच्या प्रमुखासह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. काही दिवसांनी परतावा तुमच्या बँक खात्यात जमा होईल, असे सांगून त्यांना परत पाठवले. मुदत संपून सहा महिने उलटले तरी पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.उपअधीक्षकांकडून पडताळणीशहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दुगानी यांच्या तक्रार अर्जाची पडताळणी केली. फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना शाहूपुरी पोलिसांना दिल्या. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणि रक्कम वाढण्याची शक्यता शाहूपुरी पोलिसांनी वर्तवली.
ट्रेडिंगच्या नावे दामदुप्पटच्या आमिषाने दीड कोटीची फसवणूक, कोल्हापुरात एकास अटक; पाच जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 2:29 PM