कोल्हापूर : एजीएक्स कॉइन्समध्ये पैसे गुंतवल्यास १५ महिन्यांची मुदत संपल्यानंतर दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुईखडी आणि कळंबा येथील दोघांविरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. अमित विठ्ठल कोलापटे (रा. कलिकतेनगर, पुईखडी, ता. करवीर), सागर बापू शेळके (रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा, ता. करवीर), अशी संशयित आरोपींची नावे आहेत. फसवणुकीची फिर्याद बाबूराव भागोजी बोडके (रा. विवेकानंद कॉलेजसमोर, कोल्हापूर) यांनी दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे, १९ मे २०२२ रोजी बोडके यांच्या ओळखीचे अमित यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्यासंबंधीच्या माहिती दिली. अमितने बोडके यांना आपल्या खानविलकर पेट्रोल पंपाजवळ नागाळा पार्क येथील इनव्हिजन प्रायव्हेट लिमिटेड येथे बोलावून घेतले. तिथे बोडके यांच्या ओळखीचे सागर शेळके उपस्थित होते. त्यावेळी सागर याने एजीएक्स कॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले, तसेच एजीएक्स कॉइनमध्ये १५ महिन्यांत दाम दुप्पट परतावा देत असल्याची हमी दिली. रकमेस १५ महिन्यांची मुदत संपल्यानंतर दामदुप्पट परतावा रक्कम बँक खात्यावर जमा होईल, असे सांगून विश्वास संपादन केला.त्यानंतर अमित व सागर या दोघांनीही एजीएक्स कॉइनमध्ये गुंतवणूक केली असल्याचे सांगून बोडके यांना गुंतवणुकीसाठी प्रेरित केले. बोडके यांनी बँकेत सोने तारण कर्ज प्रकरण करून तीन लाख रोख रक्कम २३ मे २०२२ रोजी नागाळा पार्कातील कार्यालयात दोघांकडे दिले. त्यानंतर दोघांनीही बाेडके यांच्या नावाने यूजर आयडी काढून त्यांचा पासवर्ड काढून दिला. दहा हजार काँटीटी वॉलेटला जमा केले. जानेवारी २०२३ मध्ये वॉलेट तपासल्यानंतर एजीएक्स कॉइनमधील आयडी बंद झाल्याचे बोडके यांच्या निदर्शनास आले. कार्यालयात चौकशीसाठी ते गेले. मात्र, कार्यालय बंद होते.बोडके यांनी अमित व सागर यांच्याकडे विचारणा केल्यानंतर एजीएक्स कॉइनचा मालक चेतन भोसले संपर्कात नाही, असे सांगितले. त्यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण येथील अमोल सुरेश कदम हा पूर्वीपासून परिचयाचा आहे. त्याने बीथ्री कॉइन ही क्रिप्टो करन्सी काढली आहे. ती जास्त फायदेशीर असल्याने बोडके यांचे एजीएक्स कॉइनमध्ये गुंतवलेले पैसे बीथ्री कॉइनमध्ये गुंतवल्याचे सांगितले. येथे तीन लाख या वॉलेटला जमा झाल्याचे दाखवले. अमोल कदम याने सात लाख रुपये परतावा मिळेल अशी हमी दिली. दरमहा पाच टक्के परतावा मिळेल असे आश्वासन दिले. याप्रमाणे दर महिन्याला १५ हजार मिळणे आवश्यक होते; पण परतावाही मिळाला नाही. मुद्दल रक्कमही मिळाली नसल्याने बोडके यांनी फिर्याद दिली.
Kolhapur Crime: दामदुप्पटच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 12:54 PM