- संदीप आडनाईककोल्हापूर - येथील न्यू कणेरकर नगर परिसरातील गेली पंधरा वर्षे भिशी जमा करणाऱ्या विभुते कुंटूबाने यंदाच्या दिवाळीत भिशीचे एक कोटी रुपये भिशीधारकांना परतच न दिल्याने सुमारे तीनशे कुटूंबिय हवालदिल झाले आहेत. या सर्वांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे केली. याप्रकरणातील भिशीचालक संदीप शंकर विभुते (वय ४२) याने २७ सप्टेंबरला आत्महत्या केली आहे. त्याचे कुटूंबिय गायब असून पैसे परत देण्याबाबत कांहीच सांगत नसल्याने गोरगरीबांची पाचावर धारण बसली आहे.
संदीप शंकर विभुते कुटूंबिय भिशी अन्याय निवारण समितीचे चंद्रकांत यादव, सदा सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, येथील न्यू कणेरकर नगर परिसरात संदीप शंकर विभुते आणि त्यांचे कुटूंबिय वार्षिक भिशी चालवतात. यावर्षी दिवाळीला फुटणाऱ्या या भिशीचे चालक संदीप विभुते यांनी आत्महत्या केल्याने तीनशे कुटूंबियांना दिवाळी साजरी करता आली नाही. या कुटंबातील महिलांनी याप्रश्नी पोलिसांना लक्ष घालण्याचे आदेश द्यावेत आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याखाली याची चौकशी करुन लाभार्थ्यांना पैसे परत करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या मदीना सय्द, जयश्री गवळी, प्रतिभा पाटील, मंगल सुतार, कलम हळेकर, मनिषा हराळे या महिलांनी त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाची माहीती दिली.
या भिशीसाठी चालकांनी गेली पंधरा वर्षे यशस्वीपणे भिशी चालवून घरकाम, असंघटित कामगार, छोटे व्यापारी यांचा विश्वास संपादन केला. दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांच्या या भिशीत अडीचशे ते तीनशे कुटूंबिय सहभागी होत असतात. पन्नास रुपयांपासून पाचशेच्या पटीतील रक्कम दरमहा भिशीसाठी पोटाला चिमटा काढून जमा करत होते. भिशीचालकाने आत्महत्या केल्याने प्रथम दुखद प्रसंगात सभासदांनी समजून घेतले, पण विभुते कुटूंबियांनी या राहत्या घरास कुलूप लावून गायब झाल्यामुळे पैसे बुडण्याच्या भितीने सारेजण हवालदिल झाले आहेत. या पैशाबाबत कोणाकडेच चौकशी करता येत नसल्याने सभासदांनी चंद्रकांत यादव यांच्याशी संपर्क साधला.