कोल्हापूर : फॉरेक्स व क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून पैसे दामदुप्पट करून देतो, असे सांगून १६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल पोलिसांनी एकास अटक केली. सचिन अर्जुन संघमित्रा (वय ४२, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, विचारेमाळ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फॉरेक्स व क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून पैसे दामदुप्पट करून देतो असे सांगून सिद्धांत देवानंद फाळके (वय २९, रा. विचारेमाळ) यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून संशयित सचिन संघमित्रा याने नेट बॅंकिंगद्वारे व रोख असे एकूण १६ लाख ५० हजार रुपये घेतले. ही घटना दि. १३ एप्रिल ते दि. १८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत घडली.पण, गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेल्या पैशाचा परतावा अगर मुद्दल परत न देता संशयिताने फसवणूक केली. याबाबत फाळके यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात दि. १० जानेवारी २०२२ रोजी तक्रार दिली होती. गुन्ह्याची व्याप्ती व गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड व सहायक फौजदार दिलीप कारंडे, हवालदार दिनेश उंडाळे, पोलीस नाईक जावेद गडकरी यांनी केला. त्यानुसार पोलिसांनी संशयित सचिन संघमित्रा याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.
तक्रारीचे आवाहनसंशयित सचिन संघमित्रा याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या प्लॅनमध्ये कोणीही गुंतवणूक केली असेल, त्याबाबत तक्रार द्यायची असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये प्रत्यक्ष येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी केले आहे.