कोल्हापूर : ट्रॅव्हल फॅक्टरी कंपनीचा मालक असल्याचे सांगत सिंगापूरला नेण्याचे आश्वासन देऊन ३ लाख १७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कथित एजंट गौरव चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या स्वाती रघुनाथ गावडे या वेदा हौसिंग सोसायटी, एकनाथ घाडी मार्ग, आंबेकर नगर, परेल, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. राजारामपुरी चौथ्या गल्लीत त्यांचे माहेर आहे. ७ नोव्हेंबर २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान हा गुन्हा घडला आहे. स्वाती या कोल्हापूरमध्ये असताना गौरव चौधरीने मोबाईलवरून त्यांना फोन करून कौटुंबिक सहलीसाठी सिंगापूरला जाण्याची योजना सांगितली. त्यानंतर स्वाती यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी सिद्धार्थप्रिती या युपीआयडीवर ३ लाख १७ हजार रूपये ऑनलाईन मागवून घेतले.मात्र, नंतर त्याने सहलीला नेण्यास टाळाटाळ सुरू केली तसेच पैसेही परत करेनासा झाला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वाती यांनी आर. ए. किडवाई मार्ग पोलिस ठाणे बृहन्मुंबई येथे समक्ष जावून फिर्याद दिली. ८ मार्चला हा गुन्हा ऑनलाईन पद्धतीने राजारामपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून तो मंगळवारी दाखल करण्यात आला आहे.
सिंगापूर सहलीला आमिषाने ३ लाखांची फसवणूक, कोल्हापूरच्या एजंटविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:24 IST