गारगोटी : सीआयडी विभागात फौजदार असल्याचे भासवून सीआयडी पोलिस खात्यात नोकरीला लावतो, अशी बतावणी करून तिघा जणांना नऊ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी फौजदार युवतीला व तिच्या मामाला भुदरगड पोलिसांनी गजाआड केले.
या दोघांनी मिळून भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींना लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रियांका प्रकाश चव्हाण (वय २२, गारगोटी,गुलमोहर कॉलनी,शिंदे चौक) व तिचा मामा विठ्ठल मारूती निलवर्ण (वय-३८, रा. निळपण,ता भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणी प्रतीक्षा प्रकाश साळवी हिने भुदरगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराने भुदरगड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.गारगोटी येथील प्रियांका चव्हाण हिने निळपण येथील प्रतीक्षा प्रकाश साळवी, प्रज्ञा प्रमोद मेंगाने, मंगेश आनंदा चौगले या तिघांना तिचा मामा विठ्ठल निलवर्ण यांच्या मध्यस्थीने सीआयडी मध्ये नोकरीला लावतो असे सांगून प्रतीक्षा कडून २७ जुलै पासून रविवारी दि २ ऑगस्ट पर्यंत ५ लाख २५ हजार, प्रज्ञा मेंगाने कडून १लाख ५०हजार , मंगेश चौगलेकडून २ लाख ५० हजार असे नऊ लाख २५ हजार रुपये घेतले होते.
या सर्वांची दहावी,बारावी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे घेऊन प्रतीक्षा हिला सीआयडी कॉन्स्टेबल, तर प्रज्ञा हिला अव्वल कारकून म्हणून अपॉइंटमेंट लेटर आणि बनावट ओळखपत्र दिले. हे पत्र कोणाला दाखवू नये म्हणून तिने सांगितले, हे पत्र जर कोणाला दाखवले किंवा सांगितले तर तुमच्या नोकरीवर पाणी पडू शकते, तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो, मग आयुष्यात कधीही नोकरी लागणार नाही.
तिच्या सांगण्याने सगळी गप्प होती पण नकळत प्रतिक्षाच्या भावाने हे पत्र व्हाट्सअप्पच्या स्टेट्सला ठेवले. हे पत्र पोलिसांनी पाहिल्यावर त्याला बोलावून घेतले आणि चौकशी केली असता खरा प्रकार बाहेर पडला.२०१७ साली प्रियांका हिने आपण सीआयडी इन्स्पेक्टर झाल्याची खोटी बतावणी करून गारगोटी शहरात पोस्टर झळकावली होती. या माध्यमातून तिने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून घेऊन आपली सीआयडी फौजदार अशी इमेज तयार करून घेतली. तिच्या या भुलथापावर लोकांचाही विश्वास बसला.
या माध्यमातून तिने अनेक बेरोजगार युवक-युवतींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगून प्रियांका व तिच्या मामांनी लाखो रूपये जमा केले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीद यांनी या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात येत होती. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन मार्गदर्शन करीत आहेत.अगदी हुबेहूब बनावट हजरपत्र आणि ओळखपत्र
अगदी हुबेहूब बनावट हजरपत्र आणि ओळखपत्र तयार करून ते लिंकद्वारे संबंधित बेरोजगार युवक अथवा युवतीला दिले जाते. हे ओळखपत्र कोणी तयार केले ? ही लिंक कोणी तयार केली ? याचा तपास होणे आवश्यक आहे.
एवढं धाडस कोठून आले ?
गल्लीत इतरांच्यासोबत पोलिसी भाषेत बोलत असते. स्वतः कोठेही नोकरीला नसताना अंगावर पोलिस अधिकाऱ्याची वर्दी, गावभागात पोस्टरबाजी, मान्यवरांच्या हस्ते हजारो लोकांच्या उपस्थितीत सत्कार करून घेणे, गोरगरीब बेरोजगार युवक आणि युवतींची लाखो रुपयांची फसवणूक करणे ! एवढे धाडस गरीब घरात जन्मलेल्या प्रियांका हिच्यात कोठून आले याची चर्चा होत आहे.
लाखो रुपयांची माया जमवली
या सगळ्या लबाडीतून गारगोटी येथे ४१ लाखांचे रो हाऊस, ५० तोळे सोने, एक चारचाकी, दुचाकी अशी लाखो रुपयांची माया जमवल्याची चर्चा सुरू होती. पोलिसांनी या रो हाऊस विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते.