जयसिंगपूर : गळितासाठी ऊसतोडणी मजूर पाठवितो म्हणून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील मुकादमाला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. परमेश्वर बाबासाहेब टेकनर (वय ३०, रा. टेकनर वस्ती, वाणीचिंचाळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार शामराव बाळू कोळी (वय ५३, रा. रुकडी) हे वाहनमालक असून सन २०१९-२० या सालाकरिता ऊसतोड करून देतो, यासाठी आठ ऊसतोडणी मजुरांची टोळी पुरविण्याची हमी संशयित आरोपी टेकनर याने कोळी यांना दिली होती. ऊसतोडणीकरिता दहा लाख रुपयांची मागणी केल्यानंतर दत्त कारखान्याकडून हमीपत्र घेऊन त्या हमीपत्राद्वारे बँकेतून वाहतूक कर्ज काढले होते. संशयिताने रोख रक्कम स्वीकारून तक्रारदार यांच्या नावे करारपत्र देखील केले होते. त्यानंतर ऊसतोडणी मजूर पाठविले नसल्याने कोळी यांनी दिलेली रक्कम परत मागितल्यानंतर ती देण्यास नकार दिला. शिवाय, ठार मारण्याची धमकी दिली. गुन्हा घडल्यापासून संशयित फरारी होता. त्याला बुधवारी (दि. ७) जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. फसवणूप्रकरणी आणखी तपासासाठी पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश मडके यांनी केला. न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.