-विश्वास पाटील
कोल्हापूर : आमशी (ता. करवीर) येथे तीन- चार तरुणांनी एकत्र येऊन नवीनच फंडा शोधून काढला आहे. तिथे तुम्ही अडीच लाख रुपये गुंतवले की लगेच तुम्हाला एक तोळ्याचे सोन्याचे नाणे मिळते व गुंतवलेली रक्कम दरमहा ५० हजार याप्रमाणे परत दिली जात आहे. लोक या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
लोकमतमधील ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या फसवणुकीसंबंधीच्या बातम्या वाचून त्याच परिसरातील लोकांनी ‘लोकमत’ला या योजनेबद्दल माहिती दिली. त्याची खातरजमा गुंतवणूकदारांकडे केल्यावर ही योजना सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही कंपनीही पुण्यात नोकरीस असलेल्या एक तरुण चालवत आहे. तो तिथे राहून शेअर ट्रेडींग करत आहे. त्याने वर्षापूर्वी कंपनीतर्फे ही योजना सुरू केली. त्यानुसार अडीच लाखाचे दहा महिन्यांत पाच लाख दिले जातात. परताव्याचा हा दर दहा महिन्यास २० टक्के इतका येतो. लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक केली असून त्यांना सोन्याचे नाणे व परताव्याची रक्कमही परत मिळाली आहे.
हीच योजना गेल्या महिन्यापासून कंपनीने बदलली आहे. आता ते तीन लाख रुपये भरल्यावर लगेच सोन्याचे तोळ्याचे नाणे दिले जाते. दहा महिने त्याला प्रत्येकी ३० हजार रुपये दिले जातात. व दहा महिने पूर्ण झाल्यानंतरच मुद्दल तीन लाख रुपये परत केली जाते. ही रक्कम कंपनी कशामध्ये गुंतवते, त्यातून एवढा मोठा फायदा कसा मिळतो.. शेअर ट्रेंडीगमध्ये सलग दहा वर्षे गुंतवणूक केल्यावरच कसेबसे साडेपंधरा टक्के परतावा मिळतो मग ही कंपनी दहा महिन्यांत २०० टक्के परतावा देते कसा, त्यासाठी पैसा कोठून आणते हा सगळाच व्यवहार संशयास्पद आहे. लोकांना परतावे मिळत आहेत, सोन्याचे नाणे मिळत आहे म्हणून मुख्यत: आमशी, म्हारुळ, सांगरुळ, खाटांगळे, बारा वाड्या, सावरवाडी आदी गावांतील गुंतवणूक या कंपनीमध्ये होत आहे.वाढदिवस दणकेबाज...या कंपनीच्या म्होरक्याचा दहा दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. फुलेवाडीजवळच्या एका लॉनमध्ये त्याचे आयोजन केले होते. किमान अडीच हजार लोकांना तिथे चमचमीत जेवण देण्यात आले. वाढदिवस इतका जंगी होता की त्यासाठीच किमान वीस- पंचवीस लाख रुपये खर्च झाले असतील, अशी माहिती मिळाली.