इचलकरंजी : भगवान महावीर सार्वजनिक उत्सव मंडळाने मोफत धर्मादाय दवाखाना सुरू केला आहे. मान्यवरांनी फीत कापून त्याचे उद्घाटन केले.
जैन समाजातील सर्व समुदायांकडून एकत्रित भगवान महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून येथील मोठे तळे परिसरात मोफत धर्मादाय दवाखाना सुरू केला होता. हा दवाखाना गरजू रुग्णांना आधार होता. गेली काही वर्षे हा दवाखाना बंद होता. उत्सव समितीने हा दवाखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दवाखान्याची पार्श्वभूमी व सोयी-सुविधांची माहिती दिली. गरजू रुग्णांसाठी नाममात्र दरामध्ये तपासणी आणि मोफत औषध, इंजेक्शन दिले जाणार आहे. सकाळ आणि संध्याकाळ हा दवाखाना सुरू राहणार आहे. आठवड्यातून एकवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमास गुंडाप्पा रोजे, बाळासाहेब सिद्धाप्पा चौगुले, बाळासाहेब पारिसा चौगुले, कुंतीनाथ पाटणी, शशिकला बोरा, श्रीकांत चंगेडिया, प्रीतम बोरा, सचिन हुक्कीरे, आदी उपस्थित होते.