आपेट??????????????????????
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून, शेतकऱ्यांना कर्ज व वीज बिलातून मुक्त करा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी शाहू मार्केट यार्ड येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील होते.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारची धोरणे व भूमिका ही शेतकरी विरोधी आहे. शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची उठवावी, गोवंश हत्या बंदी करा, वन्यजीव संरक्षण कायदा , पाळीव प्राण्यांची निर्दयी वागणूक आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी अनेक वर्षे करत आहोत; मात्र त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत. आगामी काळात सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांना आक्रमक व्हावे लागणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट आदींनी मनोगत व्यक्त केले.
सांगली जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील, के. आर. पाटील, महिला आघाडी अध्यक्षा प्रगती चव्हाण, अशोक जाधव, हनुमंत चाटे, डॉ. शंकर बावडेकर, संभाजी भोसले, धोंडिराम गुरव, अनिता जाधव, अनिता निकम, राजलक्ष्मी कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, राजू कुरंदळे , अजित पाटील, बाबासाहेब गोसावी, उत्तम पाटील, विनोद कुसाळे, बाळासोा मिरजे, योगेेेश आपेट, अनंत आपेट उपस्थित होते.
या झाल्या मागण्या -
दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करा.
शेतकऱ्यांना बाजाराची व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्या.
गाईच्या दुधाला ४० तर म्हैस दुधाला ६० रुपये दर मिळालाच पाहिजे.
रेडिरेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करा.
शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट चा फायदा मिळालाच पाहिजे.
उसाला प्रतिटन पहिला हप्ता २५०० रुपये तर ५ हजार अंतिम भाव मिळावा.