: राजलक्ष्मी नगर परिसरात प्रशासनासह पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा : उपनगरातील विविध प्रभागांतून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांची सफाई करून नालापात्रे अतिक्रमणमुक्त करा, पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी शिरू नये, यासाठी तत्काळ नियोजन करा, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
उपनगरातील राजलक्ष्मी नगर, साळोखे नगर, तपोवन, रंकाळा तलाव प्रभागातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांवर झालेली अतिक्रमणे, वाढते प्रदूषण यामुळे ऐन पावसाळ्यात क्रेशेर चौक ते संभाजी नगर देवकर पाणंद ते साळोखे नगर रस्त्यावर गुडघाभर पाणी येते. नागरी वस्तीत हे पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन ठप्प होते. यावर वर्षानुवर्षे निव्वळ चर्चा होते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेविका दीपा मगदूम, पालिका उपआयुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व स्थानिक नागरिकांसह प्रत्यक्षात पाहणी केली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निधी मंजूर असून, पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
यावेळी दीपक गुंडप, विजय मगदूम, संदीप निकम, दिग्विजय मगदूम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
फोटो : ०९ कळंबा पाहणी
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालिका प्रशासनासह राजलक्ष्मी नगर प्रभागात पाहणी केली. यावेळी शारंगधर देशमुख, दीपा मगदूम उपस्थित होते.