कोल्हापूर : अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता बाहेरगावी गेल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी व सावत्र आईने तिला चाबकाने व काठीने बेदम मारहाण केली. याबाबत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कसबा बावड्यातील तिच्या आईवडिलांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित मुलगी ही १६ वर्षे चार महिने वयाची आहे. ती चार दिवसांपूर्वी घरात कोणालाही न सांगता बाहेरगावी गेली होती. तिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसांत दिली होती. रविवारी ती सापडल्याने तिला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तिला आईवडिलांच्या ताब्यात दिले. घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला चाबकाने मारहाण केली; तर आईने काठीने मारले. तसेच सकाळी आईने तिला थंड पाण्याने अंघोळ करायला लावली. त्यानंतर माराच्या भीतीने ती मुलगी घरातून पळून जाऊन भवानी मंडपात लपून बसली. त्यावेळी अवनि संस्थेच्या माध्यमातून जुना राजवाडा व नंतर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे तिला नेऊन तिचा जबाब नोंदविला. त्यामुळे सावत्र आई व वडिलांच्या विरोधात बाल न्याय अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.