कोल्हापूर : राज्यघटनेच्या कलमनुसार प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्यादित नाही; पण ते लोकशाहीसाठी व संविधानासाठी खर्च झाले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी केले.
ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये मराठी विभाग आणि वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘माध्यम, सिनेमे, प्रेम व अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर व्याख्यानात ॲड. सरोदे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील होते. वाचनकट्टा सहसमन्वयक डॉ. सरोज बीडकर, वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम हे प्रमुख उपस्थित होते.
ॲड. सरोदे म्हणाले, वास्तवाधारित चित्रपट निर्माण व्हावेत, राज्यकर्त्यांच्या चुका लक्षात आणून द्या, राज्यघटनेच्या कलम १९ नुसार प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. विद्यार्थिनींना नकार देण्याचे स्वातंत्र्य हवे. प्रेमभावना ही जशी अभिव्यक्ती आहे, तशी ती जबाबदारीही आहे.
सूत्रसंचालन प्रा. एच.व्ही. पुजारी यांनी केले. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. प्रास्ताविक डॉ. सुजय पाटील यांनी, तर स्वागत प्रा. अनिल गस्ते यांनी केले. युवराज कदम यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास प्रा. डॉ. साधना झाडबुके, डॉ. शिवाजी जाधव, सुंदरराव देसाई आदींची उपस्थिती होती. प्रा. आर.पी. शिंदे यांनी आभार मानले.
प्रेमभावना व्यक्त करायला निर्भयता हवी
प्रेम करताना धर्म आणि जात आड येत नाहीत. जे पटत नाही ते स्पष्टपणे नाकारा. आई- वडील, बहीण, भाऊ यांचे प्रेम समजून घ्या. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह व्हावेत, प्रेमभावना व्यक्त करताना निर्भयता हवी, असेही ॲड. सरोदे म्हणाले.
फोटो नं. २००२२०२१-कोल-कमला कॉलेज
ओळ :
कमला कॉलेजमध्ये शनिवारी मराठी विभाग आणि वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने व्याख्यानात ॲड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सरोज बीडकर, युवराज कदम, प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील आदी उपस्थित होते.