कोल्हापूर : मायकल ओकू, प्रतीक सावंत, संकेत वेसणेकर आणि गोलरक्षक जिगर राठोड यांच्या उत्कृष्ट खेळीच्या फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघावर ३-० अशी मात करीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी या दोन संघांत लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचल्या. त्यात ‘फुलेवाडी’कडून संकेत वेसणेकर, अक्षय मंडलिक, अरबाज पेंढारी, अभिषेक देसाई यांनी ४-४-३ या आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार सातत्याने प्रतिस्पर्धी संयुक्त जुना बुधवार संघाच्या गोलक्षेत्रात सातत्याने आक्रमण ठेवले.
सामन्याच्या ३२व्या मिनिटाला प्रतीक सावंतने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर संयुक्त जुना बुधवारकडून शिबू सनी, रिचमंड, शिवम बडवे, प्रसाद सरनाईक, सुशील सावंत यांनी सामन्यात बरोबरी साधण्यासाठी वेगवान चढाया केल्या. मात्र, ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक जिगर राठोड याच्या उत्कृष्ट गोलरक्षणामुळे त्यांचा टिकाव लागला नाही.उत्तरार्धात सामन्यात बरोबरी साधण्यासाठी संयुक्त जुना बुधवारकडून शॉर्ट पासिंगवर भर देण्यात आला. मात्र, गोल करण्यात यश आले नाही. उलट ५५व्या मिनिटास ‘फुलेवाडी’कडून संकेत वेसणेकर याने मैदानी गोल करीत संघाची आघाडी २-० अशी वाढविली. त्यानंतर संयुक्त जुना बुधवारच्या खेळाडूंना मिळालेल्या संधीवर गोल करण्यात यश आले नाही.
सामन्याच्या ७२व्या मिनिटाला मायकल ओकू याने उत्कृष्ट गोलची नोंद करीत संघाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संयुक्त जुना बुधवार संघाला आघाडी कमी करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. सामना ३-० या गोलसंख्येवर फुलेवाडी संघाने जिंकत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.उत्कृष्ट खेळाडू - अरबाज पेंढारी (फुलेवाडी)
- लढवय्या खेळाडू - सुशील सावंत (संयुक्त जुना बुधवार पेठ)
उद्याचा सामनाशुक्रवारी महाशिवरात्रीमुळे सामन्याला सुट्टी राहणार आहे. त्यामुळे शनिवारी यजमान पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे.