कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत अखेरच्या क्षणी ‘पाटाकडील’च्या रूपेश सुर्वे याने नोंदविलेल्या गोलमुळे पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’वर ३-२ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. गुणसंख्येच्या आधारावर यापूर्वीच प्रॅक्टिस क्लब अंतिम फेरीत पोहोचले असून, या दोन संघांत उद्या, रविवारी दुपारी ३.३० वाजता अंतिम लढत होणार आहे.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सामन्यांच्या सुरुवातीपासून ‘पाटाकडील’कडून रणजित विचारे, ऋषिकेश मेथे-पाटील, रियान यादगीर, प्रथमेश हेरेकर, सुशांत बोरकर यांनी आक्रमक व वेगवान खेळी करीत प्रॅक्टिस संघावर दबाव निर्माण केला. त्याचा फायदा दहाव्या मिनिटास पाटाकडील संघास मिळाला. ओंकार पाटील याने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
या गोलनंतर ‘प्रॅक्टिस’कडून दिग्विजय वाडेकर, नीलेश सावेकर, जय कामत, सागर चिले, इंद्रजित चौगुले, राहुल पाटील, प्रकाश संकपाळ यांनी समन्वय साधत चांगला खेळ केला. त्यामुळे १४व्या मिनिटास राहुल पाटील याने गोल करीत संघाला १-१ असे बरोबरीत आणले. हीच गोलसंख्या पूर्वार्धात राहिली.उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले. त्यात ४२व्या मिनिटाला ‘प्रॅक्टिस’कडून प्रकाश संकपाळ याने गोल करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ४९ व्या ऋषिकेश मेथे-पाटील याने गोल करीत संघाला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला. सामना बरोबरीत राहणार असा प्रेक्षकांचा कयास होता.
मात्र, अखेरच्या क्षणी मैदानात आलेल्या ‘पाटाकडील’च्या रूपेश सुर्वे याने कॉर्नर किकवर मिळालेल्या संधीवर गोलची नोंद केली. त्यामुळे सामन्यात ‘पाटाकडील’कडे ३-२ अशी आघाडी मिळाली. तीच कायम ठेवत सामना जिंकला. या विजयामुळे पाटाकडील संघ पाच गुण, तर प्रॅक्टिस संघाचे चार गुण झाले आहेत. दोन्ही संघ गुणसंख्येवर प्रथम आणि द्वितीय आहेत; त्यामुळे दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
- उत्कृष्ट खेळाडू - ओंकार पाटील (पाटाकडील)
- लढवय्या खेळाडू - प्रकाश संकपाळ