कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांची प्रशासकीय बैठक उद्या, बुधवारी होत आहे. त्यानंतर बैठकीत काय ठरले, यासंदर्भातील निर्णय ते शुक्रवारी (दि. २ आॅगस्ट) सांगणार आहेत. त्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृ ती समितीचे निमंत्रक अॅड. रणजित गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांंतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रश्नासंबंधी खंडपीठ कृती समितीने २० जुलैला मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली.
यावेळी कृती समिती निमंत्रक अॅड. रणजित गावडे यांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. शासनाने जागेसह निधीची उपलब्धता करून देण्याचेही लेखी पत्र दिले आहे. आपण तत्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर न्यायाधीश नंद्रजोग यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेसंदर्भातील अभ्यास मी केला आहे. त्याचा आढावा घेतला आहे. त्यासाठी मी सकारात्मक असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास कृती समितीला दिला होता.
कृती समितीने २४ जुलै आंदोलनाची डेडलाईन ठेवली होती; परंतु न्यायाधीश नंद्रजोग यांनी उद्या, बुधवारी सर्किट बेंचबाबत प्रशासकीय बैठक घेऊन त्यामध्ये होणारा निर्णय आपणाला शुक्रवारी (दि. २ आॅगस्ट) कळविला जाईल, असे सांगितले आहे. हा निर्णय काय आहे, याची उत्सुकता लागून राहिली आहे. सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे. तो नाही झाला तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असे अॅड. गावडे यांनी सांगितले.निमंत्रण की बेंचचा निर्णयकोल्हापुरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचे निमंत्रण मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांना दिले आहे. या निमंत्रणासंबंधीची तारीख कळवितात की, सर्किट बेंचबाबतचा निर्णय हे २ आॅगस्टलाच कळणार आहे.