कोल्हापूर : टाकाळा परिसरात रणजित एंटरप्राईजेस या सराफ दुकानाचे शोरूम बनावट चावीने उघडून २६ लाख रुपयांच्या ५६ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर दुकान मालकाच्या जवळच्या मित्रानेच डल्ला मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत ही चोरी उघडकीस आणून चोरटा प्रशांत महिपती पाटील (वय ४७, रा. राजारामपुरी ११ वी गल्ली) याला बुधवारी रात्री उशिरा गजाआड केले. चोरीच्या दागिन्यांपैकी २० लाख ६४ हजार रुपये किमतीचे ४४.३ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी त्याच्या घरझडतीतून जप्त केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टाकाळा परिसरातील माऊली विहार या इमारतीत रणजीत शांतीलाल पारेख (रा. सरलष्कर भवन, जोतिबा रोड) यांचे रणजीत एंटरप्राईजेस हे सराफ दुकान आहे. पहिल्या मजल्यावर शोरूम, तर दुसऱ्या मजल्यावर ऑफिस आहे. रविवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कुलूप लावून दुकान बंद केले. सोमवारी सकाळी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप अज्ञात चोरट्याने बनावट चावीने उघडून २६ लाख रुपये किमतीचे ५६ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासासाठी विशेष पथके नेमली. शोरूमचे कुलूप काढण्यासाठी बनावट चावीचा वापर, तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे गायब केल्याने चोरटा माहितीगार असल्याचे पोलिसांनी शिक्कामोर्तब केले. त्या अनुषंगाने दुकानाशी संबंधितांची कसून चौकशी करताना प्रशांत पाटील यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली त्याची दुचाकीही जप्त केली. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सहा. पो. नि. श्रीकांत इंगवले, हे. कॉ. ऋषिकेश पवार, युवराज पाटील, लखन पाटील, शुभम संकपाळ, सागर माने, राहुल कांबळे यांनी केली.
परिसरातील सीसीटीव्हीमुळे उलगडा
दुकानमालक पारेख यांचा संशयित प्रशांत पाटील हा जवळचा मित्र होय. तो नेहमीच शोरूममध्ये येत होता. त्याने बनावट चावी करून रविवारी मध्यरात्री चोरी केली. चोरी उघडकीस येऊ नये म्हणून शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर चोरला; पण घटनेच्या मध्यरात्री परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ये-जा करताना अंधारात प्रशांत पाटीलची छबी कैद झाल्याने त्याचा खरा चेहरा उघडकीस आला.