कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी ८१ प्रभागांत स्वबळावर लढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी स्पष्टोक्ती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी दहा वर्षांत शहरात विकासगंगा आणली असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत जनतेने आमच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, भाजपमुळेच थेट पाईपलाईन रखडली. राजकारणबाजूला ठेवून त्यांनी सर्व शासकीय परवानगी मिळवून दिल्या पाहिजे होत्या. आमदार चंद्रकांत जाधव यांनी उभारलेले कार्यालय नक्कीच गोरगरिबांना आधार ठरेल. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे ठरेल. परदेशातून २० हजार लोक राज्यात आल्याचे संकेत असून सर्वांनी १५ दिवस खबरदारी घ्यावी.जे बोलतो ते सत्यात उतरवतो : पालकमंत्री पाटीलराज्यात भाजप सरकार असताना कोल्हापूरसाठी निधी मिळाला नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तातडीने ४७ कोटींचा निधी आणला. थेट पाईपलाईनचे काम मे महिन्यांत पूर्ण होणार आहे. विकासाच्या दृष्टिकोन ठेवून काम करत आहोत. कधीही चुकीचे आश्वासने दिली नाहीत. जे बोलतो ते सत्यात उतरवतो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आवर्जून सांगितले. चंद्रकांत जाधव व्हिजन असणारे आमदार आहेत. त्यांना सर्व बाबतीतील ज्ञान आहे. त्यांनी उभारलेल्या कार्यालय नागरिकांना हक्काचे कार्यालय ठरेल, असेही ते म्हणाले.ही कसली सुप्त लाटभाजपच्या एका नगरसेवकाच्या कार्यपुस्तिका प्रकाशनावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बिहारप्रमाणे कोल्हापूर महापालिकेतीही सुप्त लाट असल्याचे म्हटले. मात्र, पदवीधर मतदारसंघाचे त्यांनी १२ वर्षे प्रतिनिधीत्व केले तेथे सुप्त लाट करू शकले नाहीत. महापालिकेत काय सुप्त लाट आणणार, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.माजी आमदार मालोजीराजे पुन्हा सक्रियमाजी आमदार मालोजीराजे यावेळी आवर्जुन हजेरी लावली. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केल्यास रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांना मानणारे आजी-माजी नगरसेवकही कार्यक्रमाला उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मुश्रीफांनीही राजे पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचे म्हटले.