लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मृत्यूनंतरही कायम राहते तेच खरे मैत्र असे म्हटले जाते, याची प्रचिती सध्या राजारामपुरीतील शेंडगे कुटुंबीय घेत आहेत. प्रफुल्ल शेंडगे या व्हायोलियन वादक मित्राने वयाच्या ४३ व्या वर्षी अकाली एक्झीट घेतली, हे दु:ख पचवूनही मित्र एकत्र आले आणि अवघ्या २५ दिवसांत पावणे चार लाख रुपये जमा केले. ते आज रविवारी देवल क्लब येथे सकाळी १० वाजता एका छोटेखानी कृतज्ञता सोहळ्यात कुटुंबीयांकडे सुपूर्द केले जाणार आहेत. मित्राच्या पश्चातही त्याच्या कुटुंबीयांच्या आधाराची काठी होण्याचा आदर्श या तरुणांनी समोर ठेवला.
प्रफुल्ल शेंडगे हा हरहुन्नरी कलाकार. वयाच्या ८ व्या वर्षीपासून तो व्हायाेलिन वाजवायचा. राजारामपुरीतच त्याचे वास्तव्य. तसा त्याचा मित्रांचा गोतावळाही मोठा. पण २ मे रोजी हार्टअटॅकचे निमित्त झाले आणि प्रफुल्लने या जगाचा निरोप घेतला. तशी त्याची बेताची परिस्थिती पण त्याने कधीही कुणाकडून आर्थिक मदत घेतली नाही. त्याचा हा मानी स्वभाव माहीत असतानाही मित्रांनी त्याच्या पश्चात कुटुंबीयांची परवड नको म्हणून कुटुंबीयांच्या नकळत मदत गोळा करण्यास सुरुवात केली, आणि काय आश्चर्य, प्रफुल्लवर प्रेम करणाऱ्या कोल्हापुरासह रत्नागिरी, पुणे, मुंबई येथील दानशूरांनी क्षणाचाही विलंब न करता रक्कम पाठवली. मृत्यूनंतर अवघ्या २५ दिवसांत ३ लाख ७५ हजार रुपये जमा झाले. एखाद्या कलाकाराच्या पश्चात त्याच्या कुटुंबीयांना एवढी मोठी रक्कम कमी दिवसांत जमा करून देण्याची ही पहिलीच घटना असावी.
संदेश गावंदे, नितीन सोनटक्के, सूरज नाईक, सचिन थोरात, राजेंद्र कोरे, बाळ डेळेकर या मित्रांसह मेरी आवाज सुनो ग्रुप, ख्राईस्ट चर्च के.डी.सी कवायर ग्रुप, गायक शिक्षक मंच, दिनेश माळी फाैंडेशन, म्युझिकली युवर्स, कलांजली पवार, विरासत फौंडेशन, कॉमर्स कॉलेज तर्फे प्रसाद जमदग्नी, सुजित मिणचेकर, अभिजीत देवधर, प्रदीप राठोड या सर्वांनी हे सर्व पैसे जमा करून त्याचा विनियोग कुटुंबीयांना चांगल्या प्रकारे व्हावा यासाठीचे नियोजन केले.
मुलीच्या नावावर दोन लाख
प्रफुल्लची १० वर्षांची मुलगी आरोही हिच्या नावावर २ लाख रुपयांची किसान विकास पत्र स्वरुपात १० वर्षांसाठीची दामदुप्पट गुंतवणुकीची पावती करण्यात आली. उर्वरित १ लाख ७५ हजारांची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांच्या दरमहा खर्चाला मिळावी म्हणून पोस्ट खात्यात ठेवण्यात आली.
फाेटो: १००७२०२१-कोल- प्रफुल्ल शेंडगे