कोल्हापूर : हास्याचे कारंजे उडवीत, एकमेकांच्या हातांवर टाळ्या देत मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गप्पा..., शुभेच्छांची देवाण-घेवाण, असे उत्साही चित्र रविवारी शहरात सर्वत्र पाहावयास मिळाले. मैत्रीचे नाते दर्शविणारा ‘फ्रेंडशिप डे’ तरुणाईने आपल्या नियमित कट्ट्यांवर जमून आनंदाने साजरा केला. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ‘डे’ संस्कृतीमधील ‘फ्रेंडशिप डे’ हा पहिलाच दिवस असल्यामुळे तरुण-तरुणींमध्ये हा दिवस सेलिब्रेट करताना विशेष उत्साह दिसून आला.
शहरात कुठलाही डे उत्साहात साजरा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला रंकाळा, राजारामपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क येथे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. रविवार असल्याने सहाजिकच हा दिवस साजरा करताना तरुण-तरुणींमध्ये विशेष उत्साह होता. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने रविवारी शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी शॉप्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स आदींमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
हा दिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी आधीच तयारी करून ठेवली होती. त्यांच्या आवडत्या मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बँड, रिबीन, भेटवस्तू, शुभेच्छापत्र, फोटो फ्रेम्स्, ब्रेसलेटस् खरेदी करून ठेवले होते. शहरातील न्यू कॉलेज रविवारी सुरू असल्याने या ठिकाणी सकाळी फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
‘फ्रेंडशिप डे’ला पिवळ्या गुलाबाच्या फुलांना विशेष मागणी असल्याने रविवारी अनेक दुकानेही पिवळ्या गुलाबाच्या फुलांनी सजली होती. अनेकांनी आपल्या घरी, नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी ग्रुपने फ्रेंडशिप बँड बांधून, एकमेकांना भेटून फ्रेंडशिप डे साजरा केला. रात्री उशिरापर्यंत शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता.
गिफ्ट गॅलरी फुल्ल
रविवारी फ्रेंडशिप डेनिमित्त शहरातील विविध गिफ्ट गॅलरी हाऊसफुल्ल झाल्या होत्या. गिफ्ट गॅलरीत मित्र-मैत्रिणींसाठी सरप्राइज गिफ्ट घेऊन तसेच त्यांच्या आवडीचे गिफ्ट व मैत्रीचा संदेश देणारे कार्ड देऊन आपल्या भावना संदेशाद्वारे व्यक्त केल्या.
वन डे ट्रिपचा आनंद
फ्रेंडशिप डे हा आॅगस्टच्या पहिल्या रविवारी येतो. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने अनेक युवक-युवतींनी चित्रपट पाहणे, पार्टीसह वन डे ट्रिपचे नियोजन केले होते. त्यामुळे पन्हाळा, रंकाळा, राधानगरी, आंबोली, आंबा या मार्गावर मोठी गर्दी झाली होती.
फेसबुक, टिष्ट्वटरवर शुभेच्छामैत्री म्हणजे एक वेगळीच दुनिया... वेगळीच दुनियादारी.. अशा भावना रविवारी जे आपले मित्र-मैत्रीण भेटू शकत नाहीत, त्यांना सोशल मीडियाद्वारे पाठविण्यात आल्या. अनेकांनी फेसबुकवरून मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देणे पसंत केले. त्यामुळे फेसबुक, टिष्ट्वटरवर, व्हॅट्सअॅपवर मैत्री दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव ओसंडून वाहत होता.महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ‘डे’ संस्कृतीमधील फ्रेंडशिप डे हा पहिलाच दिवस असल्यामुळे शहरातील न्यू कॉलेजमध्ये रविवारी तरुण-तरुणींमध्ये हा दिवस साजरा करताना विशेष उत्साह दिसून आला.(छाया : नसीर अत्तार)