कोल्हापूर : आता कोल्हापुरातून सातही दिवस मुंबईसाठीविमानसेवा उपलब्ध होणार आहे. स्टार एअर कंपनीने आता नवे वेळापत्रक जाहीर केले असून, यामुळे कोल्हापूर आणि परिसरातील हवाई प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. १५ आक्टोबरपासून ही सेवा सुरू होईल.सध्या स्टार एअर कंपनीकडून मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार असे चार दिवस मुंबईविमानसेवा सुरू आहे. परंतु उर्वरित तीन दिवशी मात्र प्रवाशांची गैरसोय होत होती. अशातच शुक्रवार, रविवार आणि सोमवार या तीन महत्त्वाच्या दिवशी ही सेवा नसल्याने अनेकांना इच्छा असूनही या सेवेचा लाभ घेता येत नव्हता. ही अडचण जाणून खासदार महाडिक यांनी ही सेवा सातही दिवस व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला यश आले आहे.नव्या वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी हे विमान बंगळुरूहून कोल्हापूरकडे उड्डाण घेईल आणि १० वाजून २० मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल. त्यानंतर १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान, मुंबईला ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल, तर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान कोल्हापुरात ४ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तेच विमान ५ वाजून १० मिनिटांनी बंगळुरूला रवाना होईल.
आठवड्यातील शुक्रवार, रविवार आणि सोमवार या तीन महत्त्वाच्या दिवशी मुंबईला विमान नसल्याने उद्योग, पर्यटन आणि सेवा क्षेत्रातील सर्वांचीच अडचण होत होती. यासाठीच्या प्रयत्नांना यश आले असून, १५ आक्टोबरपासून रोज ही सेवा सुरू होत असल्याने विकासाचे नवे दालन उघडेल. - धनंजय महाडिक, खासदार