कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या प्रशासकांनी हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू केले असून, कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. याविरोधात २८ सप्टेंबरला बँकेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज झालेल्या मेळाव्यात घेतला. यावेळी कामगार नेत्यांसह कर्मचाऱ्यांनी प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविला. जिल्हा बॅँकेचे कामकाज व प्रशासकांचे धोरण याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. याबद्दल आज बॅँक एम्प्लॉईज युनियन व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅँक एम्प्लॉईज यांच्यावतीने श्रमिक भवन, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी गोविंद पानसरे होते.कर्मचारी वेतन कपात नको, कर्मचारी वेतन फरक द्या, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, कंत्राटी ठोक पगारावरील कर्मचाऱ्यांना कायम करून वेतनश्रेणीचा लाभ द्या, कर्मचारी कल्याण निधीमध्ये ढवळाढवळ बंद करा, बॅँक वर्गणी देय रक्कम अडीच कोटी त्वरित जमा करावी, आदी मागण्या युनियनच्या वतीने करण्यात आल्या. या मागण्या मान्य करण्यासाठी युनियनच्या वतीने गेली अनेक वर्षे प्रयत्न करत असताना प्रशासक त्याला दाद देत नाहीत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे नैतिक व कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे, पण केवळ योग्य आहे म्हणून उपयोग नाही. संघर्ष करावा लागेल, असे आवाहन गोविंद पानसरे यांनी केले. प्रशासक यांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर नाहीत, तर अमानुषसुद्धा आहेत. ते सहन करता कामा नये, बॅँक सुधारली आहे, तर कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क देताना का रडता, अशी विचारणा अतुल दिघे यांनी केली. पी. एच. पाटील, परुळेकर, आप्पासाहेब ढेरे, जी. एस. पाटील, भगवान पाटील, रवी सावर्डेकर यांनी प्रशासकांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. प्रशासकांच्या कारभाराविरोधात २८ सप्टेंबरला बिंदू चौकातून जिल्हा बॅँकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
जिल्हा बॅँकेवर २८ रोजी मोर्चा
By admin | Published: September 15, 2014 12:31 AM