लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आम्हाला डॉल्बी नकोच ही जनभावना करवीरनगरीतील शांतताप्रिय नागरिकांनी शनिवारी मूक मोर्चा काढून व्यक्त केली व एकतेची ताकद कधीही आवाजापेक्षा मोठी असल्याचा प्रत्यय आणून दिला. मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत काढलेल्या या मोर्चामध्ये समाजातील डॉक्टर, वकील, आदींसह मान्यवर व आबालवृद्ध सहभागी झाले. या मोर्चाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या डॉल्बीविरहित मिरवणूक मोहिमेस पाठबळच मिळाले.
पालकमंत्री पाटील यांनी यंदाची विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित करण्याचा विडा उचलला आहे. त्याला काही विघ्नसंतोषी घटक संकुचित राजकीय फायद्याचा विचार करून विरोध करीत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि ‘डॉल्बी नकोच’ही कोल्हापूरची जनभावना दाखविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्याची सुरुवात अकरा वाजता मिरजकर तिकटीपासून झाली. मोर्चाच्या अग्रभागी महिला होत्या. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मार्गावरील अनेक महिला व पुरुषांनी या मूक मोर्चात सहभाग घेत डॉल्बी लावण्यास विरोध दर्शविला. या मूक मोर्चामध्ये समाजातील सर्वच स्तरांमधील मान्यवर, डॉक्टर, वकील, तालीम संस्था, रिक्षा संघटना, महिला संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यापारी, उद्योजक, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, शाळा-कॉलेजमधील सर्व विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते.चंद्रकांतदादांच्या सासूबाईही मोर्चातया मोर्चामध्ये पालकमंत्री पाटील यांच्या सासूबाई श्रीमती शुभदा दत्तात्रय खरे (वय ७६) या देखील हिरीरीने सहभागी झाल्या. दादांनी मांडलेला डॉल्बीमुक्तीचा विचार हा कोल्हापूरच्या भल्याचा असल्याने सूज्ञ कोल्हापूरकर त्यास नक्की पाठबळ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.