कागल : राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप-आरपीआय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आता विविध समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून जाण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.तालुका पातळीवर संजय गांधी निराधार योजना समिती, रेशन धान्य दुकान समिती, एस.टी., वीज वितरण सल्लागार समिती, तालुका दक्षता समिती, विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांसह काही जिल्हा पातळीवरील पदेही यामध्ये येतात. मतदारसंघात भाजपकडून परशुराम तावरे यांनी निवडणूक लढविली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे आर. पी. आय. आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे हे कागल तालुक्यातील आहेत, तर खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यातील सत्तेतच आरपीआय, शेतकरी संघटनेला अजून कोणता सहभाग भाजपने दिलेला नसल्याने हे कार्यकर्ते फक्त चाचपणी करीत आहेत. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. दरम्यान, या सर्व अशासकीय समित्यांवर विद्यमान आमदारांचेच वर्चस्व असते. त्यातून पदांची विभागणी होऊन काही जागा सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे समजते. त्यासाठी ते आपली नावे पाठवीत आहेत.भाजप सत्तेवर आल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी पदे मिळायला हवीत. पक्षाचेही तसे धोरण आहे. तालुका पातळीवरील पदे अधिकाधिक कार्यकर्त्यांना मिळावीत यासाठी मी प्रयत्न करीत आहे. पक्षाचे नेते माझ्यावर जी जबाबदारी देतील, ती मी स्वीकारणार आहे.- परशुराम तावरे, भाजपचे विधानसभा उमेदवार
अशासकीय समिती सदस्यासाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: November 17, 2014 11:30 PM