कोल्हापूर : सासरा, दिरासह जाऊ आणि तिच्या आई-वडिलांकडून होणारा मानसिक व लैंगिक छळ, तक्रार करूनही इचलकरंजी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या नैराश्यातून विवाहितेने पती, मुलांसह पोलीस मुख्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.
शुक्रवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराने पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शफिका समीर शिकलगार (वय ३०), त्यांचे पती समीर अमीरहमजा शिकलगार (३५, रा. पुजारी माळ, इचलकरंजी) यांच्यावर कलम ३०९ प्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी, शफिका शिकलगार (३०, रा. पुजारी माळ, इचलकरंजी) यांचा पती नोकरीनिमित्त दुबईला असतो. त्या दोन मुली व मुलगा यांच्यासोबत राहतात. राहत असलेले घर सोडून जाण्यासाठी सासरा अमीरहमजा म्हमुलाल शिकलगार, दीर नियाज अमीरहमजा शिकलगार, जाऊ तबस्सुम नियाज शिकलगार व तिचे आई-वडील मानसिक व लैंगिक छळ करतात.
या त्रासाला कंटाळून तिने इचलकरंजी पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात फिर्याद दिली होती; परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे त्यांचे म्हणणे होते. आपणाला न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून शफिका शिकलगार ह्या पती व तीन मुलांना घेऊन शुक्रवारी पोलीस मुख्यालयाच्या आवारात आल्या.
या ठिकाणी त्यांनी स्वत:सह पती व मुलांच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. आगपेटी पेटविणार इतक्यात या ठिकाणी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी त्यांना रोखत आगपेटी काढून घेतली. शिकलगार कुटुंबीयाच्या आक्रोशाने मुख्यालयातील अन्य कर्मचारी बाहेर आले.
पोलीस अधीक्षक संजय मोहिते हेदेखील दुसऱ्या मजल्यावरून धावत खाली आले. त्यांनी शिकलगार कुटुंबीयांना शांत करीत अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या कक्षात नेले. या ठिकाणी त्यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी त्यांची विचारपूस केली.
कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मोहिते यांनी तुम्ही आत्महत्या की तक्रार करायला आला आहात हे सांगा, असे विचारले. त्यावर शफिका यांनी तक्रार करण्यास आलो असल्याचे सांगितले. यापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती का, अशी विचारणा केली असता त्यांनी नाही म्हणून सांगितले.
मोहिते यांनी इचलकरंजी पोलीस निरीक्षकांकडे तत्काळ फोनवरून चौकशी केली असता शफिका शिकलगार यांच्याविरोधात सासरे, दिरांनी तक्रार दिल्याचे सांगितले. शफिका यांनी अद्याप तक्रार दिली नसल्याचे सांगितले.
शिकलगार कुटुंबीयांकडून घटनेची पार्श्वभूमी ऐकून मोहिते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बारी यांना दोन्ही कुटुंबीयांना एकत्र बोलावून नेमका काय प्रकार आहे, हे समजावून घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.महिला कॉन्स्टेबलची अफवापोलीस मुख्यालयात इचलकरंजी येथील महिला कॉन्स्टेबल आत्मदहन करीत असल्याची माहिती पत्रकारांना समजली. त्यांच्यासह छायाचित्रकार तत्काळ पोलीस मुख्यालयात आले.
असाच संदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनाही मिळाल्याने ते काम सोडून तत्काळ जिन्यावरून धावत खाली आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने कर्तव्यावरील कर्मचारी भांबावून गेले. चौकशी केली असता ती कॉन्स्टेबल नसल्याचे स्पष्ट झाले.सूत्रधारावरही होणार कारवाईशफिका शिकलगार यांनी यापूर्वी इचलकरंजी पोलीस किंवा पोलीस अधीक्षकांना तक्रारीचे निवेदन दिले नव्हते, यांची त्यांनी स्वत: कबुली दिली. त्यांना आत्मदहन करायला लावणारा सूत्रधार कोण? याचा शोध घ्या, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मोहिते यांनी दिल्या.
स्वत: अप्पर पोलीस अधीक्षक या प्रकरणी लक्ष घालून शफिका यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स व त्यांना विश्वासात घेऊन चौकशी करणार आहेत. चुकीच्या पद्धतीने सल्ला देऊन संपूर्ण पोलीस यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.