कोल्हापूर : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित झाल्याने इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या कोट्यातील दोनपैकी एक राज्यमंत्रिपद कोल्हापूरला मिळण्याची दाट शक्यता असून, त्यासाठी आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी मोर्चेबांधणी केली आहे. इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकला आहे. कोल्हापूर जिल्ह्याने दहापैकी तब्बल सहा आमदार शिवसेनेला दिले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या स्थापनेतच कोल्हापूरला संधी मिळणार असे वाटत होते; पण मंत्रिपदाने जिल्ह्याला हुलकावणी दिली. त्यानंतर गेले वर्षभर ज्या ज्या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होते, त्यावेळी कोल्हापूरचे नाव आघाडीवर राहते. कोल्हापुरातून आमदार क्षीरसागर, आमदार नरके व आमदार डॉ. मिणचेकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने इच्छुकांच्या हालचाली वेगावल्या आहेत. सुरुवातीपासून क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. ‘मातोश्री’शी असलेले जुने संबंध पाहता त्यांनाच मंत्रिपद मिळेल असे वाटते; पण महापालिका निवडणुकीत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सपाटून मार खावा लागला. निवडणुकीत झालेल्या घडामोडी व निष्ठावंतांची नाराजी क्षीरसागर यांना महागात पडण्याची शक्यता आहे. नरके यांनी ‘करवीर’मधून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षांचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा आपले जनमत सिद्ध केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सहापैकी चार सदस्य, पंचायत समिती सदस्य पक्षाच्या चिन्हावर निवडून आणून त्यांनी करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांत शिवसेना बळकट केली. कुंभी-कासारी साखर कारखाना, बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी सहकारात पकड घट्ट केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आमदार नरके यांना बळ द्यावे, अशी मागणी तिन्ही तालुक्यांतील शिवसैनिकाकडून होत आहे. आमदार मिणचेकर हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून मागासवर्गीय कोट्यातून संधी मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्यासाठी एका उद्योगपतीकडून वरिष्ठ स्तरांवरून प्रयत्न सुरु असल्याचे समजते. नीलम गोऱ्हे की कोल्हापूर शिवसेनेच्या वाटणीतील दोनपैकी एका मंत्रिपदावर मराठवाड्यातील अर्जुन खोतकर व गुलाबराव पाटील यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे. एका जागेवर नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वतीने एकही महिला मंत्री नसल्याने त्यांच्या दाव्याला बळ मिळते. गोऱ्हेंना मंत्रिपद द्यायचे म्हटले तर सहा आमदार देणारा कोल्हापूर जिल्हा वंचित राहणार आहे. विधानसभा सदस्यालाच संधी शिवसेनेच्या कोट्यातील सातपैकी सुभाष देसाई, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, दिवाकर रावते हे चार विधान परिषदेचे सदस्य कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे उर्वरित दोन जागा लोकांतून निवडून आलेल्यांना द्या, अशी मागणी शिवसेना अंतर्गत कोट्यातून होत असल्याने गोऱ्हे यांचे नाव ऐनवेळी मागे पडू शकते.
क्षीरसागर, नरके, मिणचेकर यांची मोर्चेबांधणी
By admin | Published: November 14, 2015 12:54 AM