कोल्हापूर : पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (दि. १५) दिवसभर बैठका घेऊन अडतीबाबत केलेल्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांनी ठेंगा दाखविला. व्यापारी आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने शनिवारी फळबाजारातील सौदे होऊ शकले नाहीत. भाजीपाला, कांदा-बटाट्याचे सौदे सुरळीत झाले; पण दरांत शेतकऱ्यांना सरासरी २५ टक्क्यांचा तडाखा बसल्याने चार दिवस बाजारामध्ये थांबूनही घरी जाताना मात्र मोकळे गोणपाट घेऊन जाण्याची वेळच त्यांच्यावर आली. सरकारने भाजीपाला, फळे नियमनमुक्त केली. त्याचबरोबर ती अडत खरेदीदारांकडून घेण्याबाबत निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांबरोबर सरकारलाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमली असून ६ आॅगस्टपर्यंत ती आपला अहवाल देणार आहे. शुक्रवारी सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी यांनी व्यापारी, शेतकरी, समिती प्रशासन यांच्याशी चर्चा करून सौदे पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले होते. सौदे सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री खोत यांना दिले होते. त्यानुसार भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली. फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सौद्यांसाठी माल बाहेर काढला; पण सौदे होऊ शकले नाहीत. त्यानंतर अडते व खरेदीदार यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली; पण दरांत दणका बसला. कांद्याच्या दरात ३० ते ४० टक्के, तर भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३० टक्के घसरण झाली. अडत व्यापाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल होणार असल्याने व्यापाऱ्यांनी दराच्या रूपाने त्याचा झटका शेतकऱ्यांना दिल्याची चर्चा बाजार समितीत सुरू आहे. (प्रतिनिधी)कांद्याच्या सौद्यात वाद!कांदा-बटाटा सौद्यांत दर पाडल्याचे कारण पुढे करीत शेतकऱ्यांनी काही काळ सौदे बंद पाडले. यावेळी शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला; पण सहायक सचिव मोहन सालपे व विभागप्रमुखांनी मध्यस्थी करीत सौदे पूर्ववत सुरू केले. व्यापारी नेत्यांच्या कुरघोड्यागेले पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खुद्द पणन राज्यमंत्री बाजार समितीत येऊन सौदे सुरू करण्याचा प्रयत्न करतात; पण दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचे नेते मात्र श्रेयवाद व कुरघोडीच्या राजकारणात गुंतल्याने पेच निर्माण झाला आहे. शनिवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सौदे सुरू झाले; पण भाज्यांचे दर कवडीमोल ठरले. प्रतिकिलोचे दर असे -४कांदा- ८.५०, कोबी- २०, वांगी- १७, टोमॅटो- १५, गवार- २५, भेंडी- १५, काकडी- ७. कोथिंबीर- २ (पेंढी), पालक, पोकळा, मेथी- ३ रुपये पेंढी. अखेर शेतकऱ्यांच्या पट्टीतून ‘अडत’ गायब झाले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी बाबूराव लाड यांच्या दुकानातील एका शेतकऱ्याची अडतीशिवाय काढलेली पट्टी.
सदाभाऊंच्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2016 12:53 AM