लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज, मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील फळे, भाजीपाला, गुळाचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेली बारा दिवस दिल्लीत पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाची ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्याला प्रत्येक घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर बाजार समितीमधील फळे, भाजीपाला, गूळ व्यापाऱ्यांनी सौदे बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनेही बंदला पाठिंबा दिला आहे. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी शेतकरी कुटुंबातील आहेत. त्याची झळ त्यांना बसणार आहे. त्यामुळे आजच्या बंदमध्ये स्थानिक पातळीवर सहभागी व्हावे, असे आवाहन सुवर्णा तळेकर, एम. ए. पाटील यांनी पत्रकातून केले आहे. कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीनेही पाठिंबा दिला असून शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन निमंत्रक आर. के. पोवार व बाबा पार्टे यांनी केले. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बँक एम्प्लॉईज युनियनने पाठिंबा असल्याने भगवान पाटील व बळी पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
शेतकरी संघटनेचा कायद्याला पाठिंबा
देशभर कायद्याविरोधात बंद पुकारला असताना कायद्याला पाठिंबा देण्याची भूमिका शेतकरी संघटनेने (रघुनाथदादा पाटील) घेतली आहे. याबाबतचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.
या संघटनांचा पाठिंबा
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
सर्वपक्षीय नागरी कृती समिती
कॉमन मॅन संघटना
किरकोळ दुकानदार असोसिएशन
रेशन दुकानदार संघटना
सराफ असोसिएशन
मार्केट कमिटी हमाल संघटना
लाल बावटा बांधकाम कामगार संघटना
ऊसतोडणी कामगार संघटना
महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन
कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन
फेरीवाले संघटना
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ
- राजाराम लोंढे