कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळबाजार तेजीत आहे. भाज्यांची आवक वाढल्याने दरही आवाक्यात आले आहेत. लिंबूचे दर मात्र अनपेक्षितरीत्या वाढले आहेत. मेथी दुर्मीळ झाली असली, तरी कोथिंबिरीचा मात्र बाजारात सुकाळ आल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे.शहरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत फेरफटका मारला असता, बाजारपेठ पूर्वपदावर आल्याचे दिसले. गेले तीन-चार आठवडे अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाजारपेठ ओस पडली होती. आज, सोमवारी गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर, रविवारी मात्र बाजार फुललेला होता.
साहजिकच फळांची मागणी जास्त होती. आवक वाढली असली तरी दरही चढेच होते. पूजेसाठी लागणारी पाच फळे ५० ते ६० रुपये अशी होती. कच्ची केळी ४०, तर पिकलेली केळी ६० रुपये डझन, सफरचंद १०० रुपये किलो; पेरू, मोसंबी, डाळींब, चिक्कू ८० ते ९० रुपये किलो असे दर होते. सीताफळ आकारमानानुसार ९० ते १४० रुपये किलो होते.भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसले. मेथीची भाजी मात्र दुर्मीळ असून पेंढीला २० ते २५ रुपये असा दर आहे. पालक, शेपू, कांदेपात १० रुपये पेंढी आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. ५ ते १० रुपये असा पेंढीचा दर आहे. वांगी ६० ते ८० रुपये किलो आहेत. गवार ८० ते १०० रुपये, तर वाल, घेवडा ५० ते ७० रुपये किलो आहेत.
कोबी व फ्लॉवर १० ते २० रुपये गड्डा आहे. हिरवी आणि ढबू मिरचीचे दर फारच कमी झाले आहेत. २० ते ३० रुपये असा किलोचा दर आहे. टोमॅटोही १५ ते २० रुपये किलो आहेत. कारल्याचे दरही २० रुपये किलो असे झाले आहेत.
मागील आठवड्यात १०० रुपयांपर्यंत पोहोचलेला दोडका आता ३० ते ४० रुपयांपर्यंत खाली आला आहे. सांबारसाठी लागणारा भोपळाही बाजारात सर्वत्र दिसत असून, १० ते २० रुपयांना फोड असा त्याचा दर आहे.कांदा चढू लागलाकांद्याचा तुटवडा अजूनही कायम असून, तो वाढतच जाणार असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात २० ते २५ रुपये असणारा कांदा आता ३० ते ४० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. साधारणपणे गणपती ते दसरा या काळात हे दर वाढतातच, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.लिंबू कडाडलालिंबूचे दर कमालीचे वाढले आहेत. गोट्यांच्या आकाराचे लिंबू १० रुपयांना दोन ते तीन असे मिळत आहेत. बाजारात लिंबूचीही आवक कमीच दिसत आहे.