कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यतिरिक्त सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल देऊ नये. असे निर्देश सर्व पंप चालकांना दिले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कमालीची घट झाली आहे. दिवसभरात केवळ पेट्रोल १२ टक्के, तर डिझेल १४ टक्केच विक्री झाली.
गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांकरिता पेट्रोल, डिझेलची विक्री करू नये, असे निर्देश जिल्ह्यातील ३०० हून अधिक पंप चालकांना दिले आहे. केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना ओळखपत्र पाहून व त्यांची नोंद रजिस्टरला करून देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या खपात घट झाली असून पेट्रोल, १२, तर डिझेल १४ टक्केच खपले. जिल्ह्यात नियमित दिवस भरात ५ लाख ५० हजार लिटर पेट्रोल, तर ६ लाख ६० हजार लिटर डिझेलचा खप आहे. मात्र, संचारबंदी लागू झाल्यापासून हा खप ५० टक्केवर आला हाेता. आता तर दोन दिवसांपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरु आहे. त्यामुळे रविवारी पहिल्या दिवशी विक्रीत ८५ टक्के, तर सोमवारी पेट्रोलमध्ये ८८, तर डिझेलमध्ये ८६ टक्के इतकी घट झाली. दिवसभरात पेट्रोल ६६ हजार लिटर, तर डिझेल ९२ हजार ४०० लिटर खपले. अशी माहिती जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली.