कोल्हापूर: केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे सोमवारी इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पंपावर गर्दी करू नका, असे आवाहन केल्यानंतर मंगळवारी दिवसभरात ग्राहकांची गर्दी थोडी कमी झाली. दरम्यान, अफवा पसरल्यामुळे ग्राहकांनी दोन दिवस नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोलची खरेदी केल्यामुळे पेट्रोलपंप चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
कोल्हापूर जिल्हा पेट्रोल आणि डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी सांगितले की, वाहतूकदारांनी संप मागे घेतल्यामुळे सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा झाला आहे. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवरील गर्दी थोडी कमी झाली. मंगळवारीही सकाळी काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा होत्या. दहा मिनिटांपासून चाळीस मिनिटांपर्यंत थांबल्यानंतर पेट्रोल मिळत होते. दुपारनंतर गर्दी कमी झाली.