कोल्हापूर : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसात लाख रुपये घेऊन गेली सात वर्षे फरार असलेला संजय बबन जाधव (वय ३१, रा. बोराटेवडी, ता. मोर्शी, ता. हवेली, जि. पुणे) याला बोराटेवाडी मोर्शी येथे अटक केली. तो वापरत असलेले चारचाकी वाहनही जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने रविवारी ही कारवाई केली.
नरंदे (ता. हातकणंगले) येथे प्रकाश चौगले हे ऊस वाहतूक ठेकेदार राहतात. ऊस तोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ॲडव्हान्स सुमारे साडेसात लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा संजय बबन जाधव व बबन भाऊराव जाधव (रा. तडोली तांडा, ता. परळी, जि. बीड) यांच्याविरोधात २०१४ मध्ये हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल होता. न्यायालयाने संजय जाधव याला २०१५ मध्ये फरार घोषित केले.
संशयित आरोपी संजय जाधव हा मोशी (ता. हवेली, जि. पुणे) येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली असता, त्यांनी मोर्शी येथे पथक पाठवून तो राहत असलेल्या फ्लॅटवर छापा टाकून त्याला अटक केली. त्याचे चारचाकी वाहन जप्त केले. ही कारवाई सहा. पो. नि. सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, सहा. फौजदार चंदु ननवरे, हे. कॉ. सुनील कवळेकर, सचिन देसाई, राजेंद्र वरंडेकर यांनी केली.
फोटो नं. १४०३२०२१-कोल-संजय जाधव (आरोपी)