कोल्हापूर : कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एफ. एम. हॅमरल टेक्सटाइल्स लिमिटेड ही कंपनी दिवाळीखोरीत गेल्याने मागील चार महिन्यांपासून बंद आहे. ती कंपनी पुन्हा सुरू करण्यास श्रमिक उत्कर्ष सभा आणि कामगारांचे पूर्ण सहकार्य राहील, असे श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस विजय कांबळे यांनी गुरुवारी येथे सांगितले.कोल्हापूर येथील महालक्ष्मी हॉलमध्ये उत्कर्ष सभेतर्फे आयोजित कामगार मेळाव्यानिमित्त ते आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘हॅमरल टेक्सटाइल्स’ पुन्हा सुरू करण्यासाठी उत्कर्ष सभेचे प्रयत्न सुरू आहेत. जी संस्था अथवा व्यक्ती ही कंपनी सुरू करण्यासाठी ताब्यात घेण्यास इच्छुक आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, अट एकच राहील की, ज्या चुका आणि अनागोंदीच्या कामकाजामुळे संबंधित कंपनी बंद पडली, ते पुन्हा होऊ नये. कामगार हे वर्षभर दहा ते बारा हजार रुपये पगार घेण्यास तयार आहेत. वर्ष संपल्यानंतर कामगारांनी दिलेले सहकार्य लक्षात घेऊन वेतनासह अन्य घटकांबाबत कामगार संघटनेशी चर्चा करावी. ज्या विश्वासाने कामगार कंपनी ताब्यात देणार आहेत, तो विश्वास कंपनी ताब्यात घेणाऱ्यांनी सार्थ ठरवावा.>सर्वपक्षीय नेत्यांनी विचार करावास्थानिक राजकारणामुळे कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बेरोजगारी वाढत आहे. ते लक्षात घेऊन या क्षेत्रात राजकारण आणू नये. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासह औद्योगिक क्षेत्राला बळ देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सांघिक विचार करावा, असे सरचिटणीस कांबळे यांनी सांगितले.
‘हॅमरल टेक्सटाइल्स’ पुन्हा सुरू करण्यास पूर्ण सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:15 AM