कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामधील २५ टक्के आरक्षण प्रवेशप्रक्रियेचा प्रारंभ झाला आहे. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीचे कामकाज शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीकडून गुुरुवारपासून सुरूझाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील ३४२ शाळांमधील ३५६७ जागांसाठी एकूण २८१० पालकांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. ज्या शाळांना २५ टक्के आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत. आॅनलाईन लॉटरी प्रक्रिया घेण्यात आली. त्यानुसार पुण्यातील ‘एनआयसी’ सेंटरकडून पहिल्या प्रवेश फेरीसाठी १०६८ विद्यार्थ्यांची यादी निश्चित करून ‘आरटीई’ पोर्टलवरील होमपेजवर अपलोड केली आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पालकांनी पूर्ण करावी. पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम पडताळणी समितीकडून सुरूझाले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र समिती आहे.
या समितीत २0 सदस्यांचा समावेश आहे. पूर्वी शाळा प्रवेशासाठी असलेली अंतराची अट शासनाने शिथिल केली आहे; त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही शाळेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेऊन प्रवेश निश्चित करावा. काही तक्रार असल्यास तालुकापातळीवरील तक्रार निवारण समितीकडे पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे.गेल्यावर्षी निम्मे प्रवेशगेल्यावर्षी जिल्ह्यातील ३४७ शाळांमधील ३५०१ जागांसाठी ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी १५० हून अधिक शाळांतील १२२० जागांवरील प्रवेश निश्चित झाले; त्यासाठी पाच फेऱ्या घेण्यात आल्या होत्या.