कोल्हापूर : कागल येथील उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाला १0 कोटींचा निधी द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असून, हिवाळी अधिवेशनात या मागणीचे लेखी निवेदन त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.
कागल नगरपालिकेने स्वत:च्या मालकीची १५0 एकर जमीन विकसित करण्यासाठी वनविभागाला हस्तांतरित केली आहे. ही जमीन पुणे-बंगलोर राष्टय महामार्गाशेजारी असल्याने ते विकसित केले तर ते अधिक उपयुक्त होऊ शकते. यापूर्वी २०१५-१६ पासून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून येथे निरीक्षण मनोरा, पथदिवे, रस्ते सुधारणा, कमान, प्रवेशद्वार, बालोद्यान, तिकीटगृह, नक्षत्र वन, मोटर पंप, १0 हजार रोपे, पाण्याची टाकी, आदी कामे झालेली आहेत. हे उद्यान अधिक विकसित केले, तर ते आंतरराष्टय दर्जाचे होऊ शकते. म्यूझिकल लेसर शो, बटरफ्लाय गार्डन, असा प्रस्ताव सादर केला आहे; त्यासाठी १0 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. याबाबत बैठक लावण्याचे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी सचिवांना दिल्याचे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.कागलच्या उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाला निधी द्यावा, या मागणीचे निवेदन आमदार हसन मुश्रीफ यांनी विधानभवनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.