इचलकरंजी : खासदार धैर्यशील माने यांच्या केंद्रीय कोट्यातून येथील नगरपालिकेच्या शाळा डिजिटल करण्याकरिता एक कोटी रुपये व शहापूर येथील म्हसोबा मंदिर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शासनाच्या नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानातून हा निधी खासदार माने यांनी प्राप्त केला आहे. त्यांनी १९ फेब्रुवारीला नगरपालिका प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी दिल्लीच्या धर्तीवरील डिजिटल शाळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा पाठपुरावा करीत नगरपालिका शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
तसेच शहापूर (ता. हातकणंगले) येथील म्हसोबा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या सात शाळा पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण करण्याची माहिती शिक्षण सभापती मनोज साळुंखे यांनी दिली. पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिक्षणाधिकारी नम्रता गुरसाळे, नगरसेवक किसन शिंदे, महादेव गौड, भाऊसाहेब आवळे उपस्थित होते.