* २७ गावांचे सर्व्हेक्षण होणार
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीच्या सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या ६० लाखांच्या निधीला शासनमान्यता मिळाली आहे. लवकरच सर्वेक्षणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी दिली.
तालुक्यातील क्षारपड जमिनींचे प्रमाण पाहता या जमिनींचा पोत सुधारण्यासाठीच्या योजना वेगवेगळ्या पद्धतींनी राबविल्या जात आहेत. यासाठी यापूर्वीच जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी अर्थसाहाय्य देण्याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य व्हावे, याबाबत आग्रही होतो.
शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीची सद्य:स्थिती, क्षारपड जमिनीचे असणारे एकूण क्षेत्र आणि या जमिनींची सुधारणा करण्यासाठी येणारा खर्च यांबाबतची विस्तृत माहिती वेळोवेळी जलसंपदा मंत्री पाटील यांची भेट घेऊन दिली होती. या जमिनीचे सर्वेक्षण व्हावे व जमीन सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी डिसेंबर २०२० ला लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली होती. याबाबत जलसंपदा मंत्री पाटील यांनी विभागाकडून शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीबाबतचा अहवाल मागविला होता. याचाच भाग म्हणून आयुक्त पुणे यांच्याकडून ६० लाखांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील दानोळी, अर्जुनवाड, उदगाव, शिरोळ, कवठेगुलंद, कुरुंदवाड, शिरढोण, नांदणी, अब्दुललाट, हेरवाड, अकिवाट, दत्तवाड यांसह २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण होणार असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
कोट - सर्वेक्षण पूर्ण होताच क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी अर्थसाहाय्य मिळावे. यासाठींच्या निकष पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांना निधी मंजूर होण्यास राज्य शासनाकडून मदत होईल.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री
फोटो - २७०८२०२१-जेएवाय-०२-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर