पालकमंत्री सतेज पाटील यांचा पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३० गावांमधील चावडी कार्यालये बांधण्यासाठी ४ कोटी ७७ लाख २७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील नऊ, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील प्रत्येकी सहा, आजरा तालुक्यातील सात तलाठी आणि करवीर तालुक्यातील दोन कार्यालयांचा समावेश आहे.
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, महसूल यंत्रणेमध्ये चावडी कार्यालयाला महत्त्व आहे. गावागावांमध्ये शेतकरी तसेच ग्रामस्थांचा विविध कामांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क येतो. त्यामुळे या चावडी इमारतींचे बांधकाम होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन ही मंजुरी दिली आहे.
या पावसाळी अधिवेशन २०२१-२२मधील पुरवणी मागणीमध्ये या निधीची तरतूद झाली आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य लाभले आहे.
गावे अशी : करवीर - जाधववाडी आणि वसगडे
गगनबावडा - धुंदवडे, गारीवडे , गगनबावडा, असंडोली, असळज, साळवण, तिसंगी, किरवे, मांडुकली
गडहिंग्लज - हनिमनाळ, खमलेहट्टी, शिपुर, महागाव, कवळकट्टी, हडलगे
चंदगड - कोवाड, हेरे, चंदगड, आमरोळी, निटटर, शिनोळी (उत्साळी)
आजरा - खेडे, कोळींद्रे, किणे, वेळवट्टी, आजरा, उत्तूर, सरोळी.