कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ विकसित करण्याबाबत स्थापन केलेल्या समितीची बैठक महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी महापालिकेत झाली. या कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन समाधिस्थळाच्या उर्वरित कामांसाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी महापौर रामाणे यांनी दिली. या बैठकीत समाधीची मेघडंबरी ही पाषाणात न बनवता ब्राँझ धातूपासून बनविल्यास कमी वेळेत काम पूर्ण होईल, अशी सूचना मांडण्यात आली.येथील सी वॉर्डमधील नर्सरी बाग या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ विकसित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ७० लाखांची निविदा काढण्यात आली असून यामध्ये मुख्य समाधीच्या चबुतऱ्याचे काम ६० टक्के पूर्ण झाल्याची माहिती या समितीच्या बैठकीत देण्यात आली. समितीचे सदस्य सचिव व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी प्रास्ताविक केले. अभिजित जाधव यांनी या समाधिस्थळासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची सविस्तर माहिती दिली. छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी ६ मे रोजी आहे. तोपर्यंत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे मत मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केले. या समाधीची मेघडंबरी पाषाणात न बनवता ब्राँझ या धातूपासून बनविल्यास कमी वेळात काम पूर्ण होईल. तसेच दिसण्यासही आकर्षक आणि आयुष्यमानही जास्त असेल, अशी सूचना इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी, छ. शाहू ट्रस्टच्या मालकीची जागा महापालिकेच्या ताब्यात मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचा ना हरकत दाखला आवश्यक असल्याचे नमूद केले. ही जागा महापालिकेच्या ताब्यात मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि समाधिस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करू, असे माजी नगरसेवक आदिल फरास यांनी सांगितले.या बैठकीस स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. डी. राठोड, उपशहर अभियंता एस. के. पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, रियाज सुभेदार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शाहू समाधिस्थळासाठी निधी
By admin | Published: March 01, 2016 12:15 AM