लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हातकणंगले ते इचलकरंजीदरम्यान आठ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी लागणाऱ्या निधीची लवकरच तरतूद केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
या मार्गासाठी निधी लवकर देऊन काम सुरू करावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे बुधवारी केली. या रेल्वेमार्गाला २०१७ साली मंजुरी मिळाली आहे. यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करून तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रेल्वेमार्गाचे भूमिपूजनही झाले होते. त्याचबरोबर २०१८ ला या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सेंट्रल रेल्वे पुणे यांच्यावतीने पूर्ण केले असून याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली होती. परंतु यानंतर आवश्यक ती तरतूद करण्यात आलेली नसल्याने काम प्रलंबित आहे तरी या रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करून इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला बळ द्यावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने व खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे केली.
फोटो ओळी : हातकणंगले ते इचलकरंजीदरम्यान आठ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी लागणाऱ्या निधीची लवकरच तरतूद करावी, या मागणीचे निवेदन खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलिक यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिले. (फोटो-१००२२०२१-कोल- हातकणंगले)