कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या शाहू जन्मस्थळचा ५० लाखांचा निधी गतवर्षी शासनाकडे परत गेला आहे. यंदाच्या वर्षी अद्याप निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र, वस्तुसंग्रहालयाचे चित्रकार, शिल्पकारांकडील काम सुरू असल्याचे जन्मस्थळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाच्या वस्तुसंग्रहालयाच्या कामासाठी राज्य शासनाने २ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी ५० लाख पुरातत्वकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, दीड वर्षापूर्वी खासदार संभाजीराजे यांनी काम थांबवायला सांगितले. नंतर कोरोना सुरू झाला. या घडामोडीत गतवर्षी मार्चमध्ये ५० लाखांचा निधी शासनाकडे परत गेला. झालेल्या खर्चाची बिले सादर केल्यानंतरही वर्षभरात शासनाकडून निधी आलेला नाही. नवीन वर्षासाठी तरतूददेखील करण्यात आलेली नाही. मात्र, चित्रकार, शिल्पकारांना दिलेले काम सुरू असल्याचे पुरातत्वचे अधिकारी उत्तम कांबळे यांनी सांगितले.
--